तडिपार हजारे सभागृहात
By admin | Published: August 18, 2015 03:40 AM2015-08-18T03:40:51+5:302015-08-18T03:40:51+5:30
जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडिपार करण्यात आलेला काँग्रेसचा नगरसेवक आणि कुख्यात गुन्हेगार पुरुषोत्तम नागोराव
नागपूर : जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडिपार करण्यात आलेला काँग्रेसचा नगरसेवक आणि कुख्यात गुन्हेगार पुरुषोत्तम नागोराव हजारे (वय ३७) सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हजर झाल्यामुळे पालिका वर्तुळात चर्चेचा भूकंप आला. राजकीय वर्तुळात दिवसभर हजारेच चर्चेचा विषय होता.
कुख्यात गुंड हजारे पारडी भागाचा नगरसेवक आहे. त्याने कळमन्यात गुन्हेगारांची एक टोळीच तयार केली असून, प्राणघातक हल्ल्यांसह अनेक गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. हजारेचे याच भागातील लांजेवार टोळीसोबत वैमनस्य आहे. त्यांच्यात अनेकदा खटके उडाले. एकमेकांवर हल्ले करणे, अपहरण करणे, मारहाण करणे, धमक्या देणे असेही प्रकार झाले आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वृत्तीत बदल होत नसल्यामुळे कळमना पोलिसांनी हजारेविरुद्ध हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार २१ जुलैला या अहवालाला पोलीस आयुक्तालयातून संमती मिळाली. त्यानंतर २५ जुलैला परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्तांनी हजारेंच्या हद्दपारीचा आदेश काढला.
पोलिसांच्या परवानगीनेच सभागृहात
हजारे याने सभेला हजर राहण्यासाठी पोलीस विभागाकडे रीतसर परवानगी मागितली होती. ज्याने तडिपारीचा आदेश काढला, त्याच अधिकाऱ्याला संबंधित व्यक्तीला विशिष्ट कारणामुळे काही अवधीसाठी प्रतिबंधित ठिकाणी हजर राहाण्याची परवानगी देता येते. हजारे लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवक आहे. त्यामुळे आपल्याला सभेला हजर राहणे गरजेचे आहे, असे सांगून त्याने परिमंडळ ३ च्या उपायुक्तांकडून रीतसर परवानगी मिळविली होती.