ताडोबाची सफर जीवावर बेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:17 AM2020-12-03T04:17:48+5:302020-12-03T04:17:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ताडोबा अभयारण्याच्या सफरीला निघालेल्या नागपूरच्या गोयल कुटुंबावर मध्येच काळाने झडप घातली. भरधाव कार नाल्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताडोबा अभयारण्याच्या सफरीला निघालेल्या नागपूरच्या गोयल कुटुंबावर मध्येच काळाने झडप घातली. भरधाव कार नाल्यात कोसळल्याने कारमधील पुतणीचा जागीच मृत्यू झाला तर उपचारासाठी नागपूरकडे आणत असताना काकांचा मृत्यू झाला. सना आणि मोनू अशोक गोयल अशी मृतांची नावे आहेत. तर
अन्य चौघांची प्रकृती गंभीर आहे.
सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास चिमुरजवळ झालेल्या या भीषण अपघाताचे वृत्त कळताच नागपुरातील उद्योग व्यावसायिकात तीव्र शोककळा पसरली.
स्थायी समितीचे माजी सभापती आणि शहरातील उद्योजक
अशोक गोयल यांच्या कुटुंबातील सदस्य दोन वाहनांनी
नागपूर वरून ताडोबा अभयारण्याच्या सफरीला जात होते. कोलारा जवळील देवरी येथील वन्य विलास या रिसॉर्ट मध्ये त्यांनी ऑनलाईन बुकिंग केली होती. सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी चिमूर जवळील रिसॉर्ट पासून ५०० मिटर अंतरावरील तुकुमच्या भडगा नाल्याच्या वळणावर एन्डोव्हर कार (MH 49 KB 2489) अनियंत्रित झाली आणि नाल्यात पडली. त्यामुळे सना जागीच गतप्राण झाले. तर तिचे काका मोनू उर्फ अमीनेश अग्रवाल यांनी नागपूर येथे उपचाराकरिता आणले जाताना त्यांनी वाटेत प्राण सोडला.
या कार मध्ये चालक ज्ञानेश्वर वसंता नरड (वय ३८), मिनू अमिनेश अग्रवाल (३२) , नेहा आशिष अग्रवाल (वय ३६), आणि ईशु अनिमेश अग्रवाल (वय १७) होते.
या अपघाताचे वृत्त कळताच शहरातील उद्योजक आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र शोककळा पसरली. गोयल यांच्या निवासस्थानी त्यांच्या आप्तस्वकीयांनी मोठी गर्दी केली. आमदार गिरीश व्यास, जयप्रकाश गुप्ता, राधेशाम सारडा अतुल कोटीच्या यांच्यासह अनेकांनी धाव घेतली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून गोयल कुटुंबीयांचे सांत्वन केले.
----
दोन वर्षात दुसरा आघात
अशोक गोयल यांच्या कुटुंबीयांवर गेल्या दोन वर्षात झालेला हा दुसरा आघात आहे. यापूर्वी अशोक गोयल यांचा एक मुलगा काळाने हिरावून नेला. तर आता दुसरा मुलगा आणि नातही अपघातात ठार झाल्याने अशोक गोयल आणि त्यांच्या कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
---