कामठीच्या शुक्रवारी बाजारात ताेबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:09 AM2021-09-11T04:09:18+5:302021-09-11T04:09:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशाची मूर्ती व विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी कामठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशाची मूर्ती व विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी कामठी शहरातील शुक्रवारी बाजारात शुक्रवारी (दि. १०) गर्दी केली हाेती. बहुतांश नागरिक काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करीत नसल्याचे दिसून आले; मात्र स्थानिक नगरपालिका व पाेलीस प्रशासनाने याकडे कानाडाेळा करणे पसंत केले.
काेराेना संक्रमण पूर्णपणे नाहीसे झाले नाही, याची पूर्णपणे जाणीव असतानाही नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांचा हा बेफिकीरपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
कोरोना संक्रमण पुन्हा वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी विमला आर यांच्या आदेशान्वये तहसीलदार अक्षय पोयाम यांनी नागरिकांना कोविड १९ च्या प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करून सण व उत्सव साजरे करण्याबाबत वारंवार आवाहन केले हाेते; परंतु शुक्रवारी बाजारातील गर्दी पाहता, कुणालाही प्रशासनाचे आवाहन व काेराेनाचे साेयरसुतक नसल्याचे दिसून आले. कारण, बहुतेकांनी मास्कचा वापर केला नव्हता तर कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नव्हते.
काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी विमला आर यांनी पालिका प्रशासनाला दिले हाेते; परंतु पालिका प्रशासनाने याकडे साेयीस्कर दुर्लक्ष केले. काही दिवसांपूर्वी या उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिका प्रशासनाने पाेेलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली हाेती. मागील १० दिवसांपासून बाजारात कुणीही नागरिकांना याबाबत साधी विचारणा करताना दिसून येत नाही. मग कारवाई करणे दूरच राहिले.
...
शासकीय आदेशाची पायमल्ली
काेराेना संक्रमण पूर्णपणे नाहीसे न झाल्याने नागरिकांनी खरेदी करताना बाजारात गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकाेर पालन करावे, घराबाहेर पडण्यापूर्वी मास्कचा नियमित वापर करावा, यांसह काही उपाययाेजनांचे पालन करण्याच्या सूचना नागरिकांना केल्या. याबाबत जिल्हा प्रशासनाने नगरपालिका प्रशासन पाेलीस व महसूल विभागालाही लेखी सूचना दिली हाेती. कामठी शहरात या सर्व बाबींची पायमल्ली करण्यात आली; मात्र याची कुणीही दखल घेतली नाही.
...
तिसऱ्या लाटेची सुरुवात
काेराेना संक्रमणाच्या पहिल्या दाेन लाटेत कामठी शहर व तालुका आघाडीवर हाेता. त्यामुळे नागरिकांनी अनुभव गाठीशी ठेवून स्वत: व इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे. तालुक्यात नुकतेच काेराेनाचे तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात काेराेना संक्रमणाची तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनासाेबतच पाेलीस व महसूल विभागाने सक्तीने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.