दिवसा टेलरिंग अन् रात्री चोर, दिवाळीत एकट्यानं केल्या १० घरफोड्या; ४४.६१ लाखांचा माल जप्त

By योगेश पांडे | Published: November 23, 2023 09:17 PM2023-11-23T21:17:18+5:302023-11-23T21:18:37+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.

Tailoring by day and thieves by night, 10 house burglaries done alone during Diwali; 44-61 lakh goods seized | दिवसा टेलरिंग अन् रात्री चोर, दिवाळीत एकट्यानं केल्या १० घरफोड्या; ४४.६१ लाखांचा माल जप्त

दिवसा टेलरिंग अन् रात्री चोर, दिवाळीत एकट्यानं केल्या १० घरफोड्या; ४४.६१ लाखांचा माल जप्त

नागपूर : दिवाळीच्या सुट्यांमध्ये रहिवासी बाहेरगावी गेल्याची संधी साधत सोनेगाव व प्रतापनगरात १० घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात अखेर यश आले आहे. या चोरट्याकडून दागिने व रोख ३५ लाख रुपयांसह ४४.६१ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. अमोल राऊत (बोरकुटे ले आऊट, बुटीबोरी) असे चोरट्याचे नाव असून तो टेलरिंगचे काम करतो. दिवसा कपडे शिवणारा अमोल रात्री सराईत चोर व्हायचा आणि एकट्यानेच घरफोडी करायचा. त्याच्या चौकशीतून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.

दिवाळीच्या कालावधीत सोनेगाव व प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० घरफोड्या झाल्या. २१ दिवसांत शहरात ५५ घरफोड्यांची नोंद झाली. यामुळे पोलीस यंत्रणेला घाम फुटला होता. वरिष्ठांनी फटकारल्यानंतर चोरट्याच्या तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी घरफोडी झालेल्या दुपारे ले आऊट, सोनेगाव, भेंडे ले आऊट, प्रतापनगर परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केली. त्यात संशयास्पद आरोपी दिसला. दरम्यान बुधवारी अमोल बुटीबोरी परिसरात संशयास्पदपणे फिरत होता. एके ठिकाणी चोरी करत असताना लोकांची नजर त्याच्यावर गेली. पकडले जाण्याच्या भीतीने अमोलने दुचाकी सोडून पळ काढला. बुटीबोरी पोलिसांनी दुचाकीची झडती घेतली असता त्यात दागिने व रोख रक्कम सापडली.

अमोल हा सराईत चोरटा असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तेथेदेखील रोख रक्कम व दागिने आढळले. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकानेदेखील तिकडे धाव घेतली. त्याच्या वर्णनावरून शोध सुरू झाला. अखेर त्याला पकडण्यात यश आले. चौकशीदरम्यान त्याने १० घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ४४.६१ लाखांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, राजेंद्र गुप्ता, प्रवीण महामुनी, सचिन भोंडे, बबन राऊत, विनोद देशमुख, नितीन वासनिक, सुनित गुजर, मनोज टेकाम, सुशांत सोळंके, हेमंत लोणारे, शरद चांभारे, सोनू भावरे, योगेश वानसिक, रितेश तुमडाम, शिवशंकर रोठे, रवी राऊत, नितीन बोपुलकर, योगेश सेलुकर, चंद्रशेखर भारती, रविंद्र खेडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस आयुक्तांनी या पथकाला ५० हजारांचे रिवॉर्ड घोषित केले आहे.

-दोन वाजल्यानंतर करायचा घरफोडी, डीव्हीआरदेखील चोरायचा
अमोल राऊत हा एकटाच घरफोडी करायचा. रात्री सात ते १२ या कालावधीत तो रहिवासी भागात फिरायचा. याच वेळेत लाईटमुळे घरात कुणी आहे की नाही हे कळायचे. त्यानंतर तो नेमके घर निवडायचा व रात्री दोन वाजेनंतर दुचाकीने येऊन घरफोडी करायचा. जर घरात सीसीटीव्ही असला तर तो तेथील डीव्हीआरदेखील काढून न्यायचा.

-असा आहे जप्त करण्यात आलेला माल
- ६५ तोळे सोन्याचे दागिने
- ६३६ ग्रॅम चांदीचे दागिने
- २८० युएस डॉलर्स
- घड्याळ
- सायकल, मोपेड
- मोबाईल
- रोख ६.९२ लाख
 

Web Title: Tailoring by day and thieves by night, 10 house burglaries done alone during Diwali; 44-61 lakh goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.