तायवाडेंना जिल्हा बँक नडली
By admin | Published: June 25, 2014 01:17 AM2014-06-25T01:17:05+5:302014-06-25T01:17:05+5:30
दुसरीकडे जिल्हा बँकेने तायवाडेंची पत घसरविली. तायवाडे यांच्या पत्नी डॉ. शरयु या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष होत्या. आर्थिक डबघाईस आलेली जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज, शिक्षक, कर्मचाऱ्यांना पगार,
नागपूर : दुसरीकडे जिल्हा बँकेने तायवाडेंची पत घसरविली. तायवाडे यांच्या पत्नी डॉ. शरयु या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष होत्या. आर्थिक डबघाईस आलेली जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज, शिक्षक, कर्मचाऱ्यांना पगार, निवृत्तांना पेन्शनची रक्कम देऊ शकली नाही. जिल्हा बँकेमुळे तायवाडे यांच्यावरील नाराजी वाढत गेली.
तायवाडे यांची तीन वर्षांपासून विद्यापीठात सत्ता आहे. पण त्या सत्तेतून लोकहीत साधून स्वत:साठी ‘फिल गुड’ वातावरण त्यांना तयार करता आले नाही. बबनराव साडेतीन वर्षे ज्यांच्यासोबत दिसले, निवडणुकीत त्यातील बहुतांश पडद्यामागून सोलेंसोबत होते. मात्र, त्यांचे निष्ठावान शेवटपर्यंत सोबत राहिले. तायवाडेंच्या कार्यकर्त्यांनी माहोल तयार केला. पण हा माहोल त्यांना मतपेटीत बंदिस्त करता आला नाही. यंग टिचर्सच्या बळावर तीन दशकानंतर तायवाडे यांनी विद्यापीठ जिंकले. संघटनेतील लोकांना ‘क्लास वन ’ केले. मात्र, त्यांनी पदवीधरमध्ये तायवाडेंचा वर्ग सोडला. २५० महाविद्यालयांवर घातलेली प्रवेश बंदी उठविण्यात तायवाडे कमी पडले. त्यामुळे संस्थाचालक रुसले. विद्यापीठात डॉ. पाराशर यांच्या संयोजनात तयार करण्यात आलेली महायुती या निवडणुकीत मात्र विखुरली. पाराशर गडकरी प्रेमापोटी सोलेंसोबत राहिले. याच युतीतले महेंद्र निंबार्ते यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढविली. ते भाजपची मते घेतील, अशी तायवाडे समर्थकांना अपेक्षा होती. मात्र, भाजपच्या ‘कमिटेट’ मतदारांनी निंबार्ते यांना वाट चुकल्याची जाणीव करून दिली.
दलित नेत्यांना जे जमले नाही ते गजभिये यांच्या रूपात एका माजी सनदी अधिकाऱ्यांनी करून दाखविले. दलित, बहुजन मतदारांची मोट बांधण्यात त्यांना यश आले. काँग्रेस, भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही धोक्याची घंटा आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेस फक्त बॅनरवर
डॉ. तायवाडे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. मात्र, काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत फक्त बॅनरवरच दिसला. नेते दिसले ते फक्त एका प्रचार सभेत स्टेजवर. गडकरींच्या विरोधात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख प्रचारासाठी आले होते. मात्र, यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वेळ देऊनही आले नाहीत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आले पण त्यांचा प्रभाव पडला नाही. काँग्रेस नेते मतदानाच्या दिवशी बूथवर तर दिसले नाहीच, पण मतमोजणीलाही फिरकले नाहीत. काँग्रेसकडून लढलो नसतो तर कदाचित यापेक्षा जास्त मते मिळाली असती, अशी खंत निकालानंतर तायवाडे समर्थक व्यक्त करीत आहेत.