दोषयुक्त कार विक्री प्रकरणात ताजश्री कार्सचे अपील खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 08:48 PM2020-09-07T20:48:02+5:302020-09-07T20:49:59+5:30
दोषयुक्त कार विक्री प्रकरणातील आदेशांविरुद्ध होंडा कारचे डीलर एम्परर होंडा मे. ताजश्री कार्सचे संचालक अविनाश भुते यांनी दाखल केलेले अपील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केले. आयोगाचे पीठासीन सदस्य ए. झेड. ख्वाजा व सदस्य ए. के. झाडे यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोषयुक्त कार विक्री प्रकरणातील आदेशांविरुद्ध होंडा कारचे डीलर एम्परर होंडा मे. ताजश्री कार्सचे संचालक अविनाश भुते यांनी दाखल केलेले अपील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केले. आयोगाचे पीठासीन सदस्य ए. झेड. ख्वाजा व सदस्य ए. के. झाडे यांनी हा निर्णय दिला.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने २१ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या आदेशांना या अपीलद्वारे आव्हान देण्यात आले होते. परंतु, आव्हान देण्यास विलंब केल्यामुळे अपील फेटाळण्यात आले. निर्णयातील माहितीनुसार, मूळ तक्रारकर्ते राम करहू यांनी ताजश्री कार्सकडून १२ लाख ३२ हजार ७३८ रुपयांत कार खरेदी केली होती. त्यांना ३१ मार्च २०१७ रोजी कार हस्तांतरित करण्यात आली. त्या कारमध्ये करहू यांना सुरुवातीपासूनच विविध समस्या जाणवायला लागल्या. त्यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, पण त्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता करहू यांना नवीन कार देण्यात यावी किंवा त्यांचे १२ लाख ३२ हजार ७३८ रुपये १० टक्के व्याजासह परत करण्यात यावे, असे आदेश ताजश्री कार्सला दिले. तसेच, करहू यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. या आदेशांविरुद्ध ताजश्री कार्सने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी सदर अपील दाखल केले होते. करहू यांच्यातर्फे अॅड. श्रीकांत सावजी यांनी कामकाज पाहिले.