ताजश्री समूह, बिल्डर आणि व्यापाऱ्याकडे गुन्हेशाखेची धडक

By admin | Published: August 30, 2015 02:39 AM2015-08-30T02:39:27+5:302015-08-30T02:39:27+5:30

हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या वासनकर समूहाकडून मोठी रक्कम वळती करुन घेतल्याचे उघड ...

Tajshree group, builder and trader hit crime trail | ताजश्री समूह, बिल्डर आणि व्यापाऱ्याकडे गुन्हेशाखेची धडक

ताजश्री समूह, बिल्डर आणि व्यापाऱ्याकडे गुन्हेशाखेची धडक

Next

नागपूर : हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या वासनकर समूहाकडून मोठी रक्कम वळती करुन घेतल्याचे उघड झाल्यामुळे गुन्हेशाखेच्या विविध पथकांनी नागपुरातील ताजश्री समूहाचे संचालक, बिल्डर आणि स्टील व्यापाऱ्यांकडे शनिवारी धाडी घातल्या. या तिघांशी संबंधित एकूण ११ ठिकाणी गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १० तास कसून तपासणी केली आणि ११ लाख रुपये रोकड तसेच कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. या कारवाईमुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
वेगवेगळ्या योजनांचे मृगजळ निर्माण करून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या प्रशांत वासनकरविरुद्ध गेल्या वर्षी लोकमतने विशेष वृत्तमालिका प्रकाशित केल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्या कंपनीशी संबंधित नातेवाईक आणि एजंटस्विरुद्धही गुन्हे दाखल करून त्यांनाही कारागृहात टाकले. सध्या ही मंडळी कारागृहात बंदिस्त आहे. तर, पोलीस वासनकरविरुद्ध सबळ पुरावे गोळा करतानाच त्याने कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट कशी लावली त्याचा शोध घेत आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांना काही नोंदी आढळल्या. त्यानुसार, वासनकरच्या बँक खात्यातून अविनाश भुते, बिल्डर संतराम चावला आणि स्टील व्यापारी पंकज राठी यांच्यासोबतही कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या नेतृत्वात कारवाईची योजना तयार करण्यात आली. त्यासाठी शुक्रवारी प्रदीर्घ विचार विमर्श केल्यानंतर गुन्हेशाखेच्या आठ पोलीस निरीक्षकांसह ६० ते ७० जणांना शनिवारी सकाळी गुन्हेशाखेत हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले.
दहा पथकांनी केली कारवाई
ताजश्री समूह, बिल्डर आणि व्यापाऱ्याकडे गुन्हेशाखेची धडक
नागपूर : सकाळी सर्व हजर होताच वेगवेगळे दहा पथके तयार करून एकाच वेळी अविनाश भुते यांच्या ताजश्री समूहाच्या नंदनवन, देवनगर, साईमंदिर चौक, मनिषनगरातील वेगवेगळ्या शोरूम आणि निवासस्थानी, बिल्डर संतदास चावलाच्या बैरामजी टाऊन येथील बंगल्यात तसेच व्यापारी पंकज राठीच्या शिवाजीनगर (रामनगर) परिसरातील बंगल्यावर गुन्हेशाखेच्या पथकांनी एकाच वेळी धाडी घातल्या.(प्रतिनिधी)
कुठे कुठे झाडाझडती
अविनाश भुते यांच्या नंदनवनमधील ताजश्री निवासस्थानी, वर्धा मार्गावरील एम्पेरियल होण्डा शोरूम, समर्थनगर हिंदुस्थान कॉलनी, ताजश्री होण्डा शोरूम देवनगर, ताजश्री यामाहा खामला, ताजश्री शेवरलेट वाडी, ताजश्री यामाहा नंदनवन, ताजश्री आॅटो हिंगणा. पंकज महेशकुमार राठी यांचा शिवाजीनगरातील नवीन बंगला तसेच मंगलम हिल रोड, शिवाजीनगर आणि संतदास चावला यांच्या बैरमजी टाऊनमधील सदोदय विला या निवासस्थानी तसेच पागलखाना चौकाजवळच्या कार्यालयात गुन्हेशाखेचे पीआय धाने पाटील, महेश संकेश्वरी, प्रदीप लांडे, फुलपगारे, कडकधोंड, नलावडे, मदने पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी झडती आणि जप्तीची कारवाई केली.

Web Title: Tajshree group, builder and trader hit crime trail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.