ताडाेबात वाघांसाेबत फुलपाखरांचेही घ्या दर्शन! ७ नव्यांसह १३४ प्रजातींची नाेंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2023 08:20 AM2023-01-03T08:20:00+5:302023-01-03T08:20:02+5:30
Nagpur News ताडाेबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हा रुबाबदार वाघांसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, आता १३४ प्रजातींची लाखाे फुलपाखरेही ताडाेबात भिरभिरताना दिसतात.
निशांत वानखेडे
नागपूर : ताडाेबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हा रुबाबदार वाघांसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, आता वाघांसाेबत रंगीबेरंगी फुलपाखरांची वसाहत म्हणून ओळख निर्माण हाेत आहे. पूर्वी अस्तित्वात असलेल्या १०७ प्रजातींमध्ये अभ्यासकांनी २७ नव्या प्रजातींची फुलपाखरे शाेधून काढली आहेत. आता १३४ प्रजातींची लाखाे फुलपाखरे ताडाेबात भिरभिरताना दिसतात.
सेलू येथील डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आशिष टिपले आणि ताडाेबाचे विभागीय अधिकारी शतानिक भागवत यांनी २७ नव्या प्रजाती शाेधून काढण्यात यश मिळविले. डाॅ. टिपले यांनी २००८ ते २०१० दरम्यान ताडाेबात फुलपाखरांचे पहिले सर्वेक्षण करून १११ प्रजातींची नाेंद केली हाेती. हा नवा अभ्यास २०११ ते २०२१ या दहा वर्षांच्या काळात केला आहे. त्यांचा शोधनिबंध ‘ऑफइन्सेक्ट बायोडायव्हर्सिटी अँड सिस्टेमॅटिक्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. उद्याने, वृक्षारोपण केलेली ठिकाणे आणि कुरणे यांसारख्या माणसांचा वावर असलेल्या ठिकाणी फुलपाखरे फार कमी आढळली. पावसाळ्यापासून हिवाळ्याच्या सुरुवातीपर्यंत फुलपाखरे जास्त प्रमाणात आढळली. परंतु, त्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीस (मार्च) त्यात घट झाली. खाद्य वनस्पतींची अनुपलब्धता आणि पाण्याची कमतरता हे या घसरणीचे कारण असू शकते, असे त्या शाेधपत्रकात नमूद केले आहे.
संशाेधनातील महत्त्वाच्या नाेंदी
ताडोबा राष्ट्रीय उद्यानाच्या नोंदीत २७ नवीन प्रजातींची भर घालून, आता फुलपाखरांच्या एकूण १३४ प्रजातींची नोंद करण्यात आली. अभ्यासात आढळेल्या एकूण ६० प्रजाती सहज आढळणाऱ्या, ३४ प्रजाती सामान्य, ९ वारंवार आढळणाऱ्या, १९ दुर्मीळ आणि १२ अत्यंत दुर्मीळ आहेत. यापैकी सुमारे १२ प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये संरक्षित आहेत. निम्फॅलिडे कुळातील ४३ प्रजाती या अभ्यासात आढळल्या असून त्यापैकी ४ प्रजातींची ताडोबात पहिल्यांदाच नोंद झाली आहे.
क्षारांचे स्रोत असणाऱ्या देशी वनस्पतींची लागवड आवश्यक
फुलपाखरे परागीकरणासाठी महत्त्वाची असतात. त्यामुळे फुलपाखरू हा पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे संवर्धन करणे ही आपली गरज आहे. निरोगी आणि उत्तम आनुवंशिक वैविध्य असणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती टिकून राहण्यासाठी विदेशी खाद्य वनस्पतींऐवजी विविध प्रथिने आणि क्षारांचे स्रोत असलेल्या देशी वनस्पतींची लागवड करणे आवश्यक आहे.
-डाॅ. आशिष टिपले, कीटक अभ्यासक.