पतीच्या मृत्यूस कारणीभूत आरोपींवर कारवाई करा
By admin | Published: May 26, 2016 02:59 AM2016-05-26T02:59:16+5:302016-05-26T02:59:16+5:30
मिरगीचा आजार नसताना वाडीच्या ‘एमआय क्लब’मध्ये ड्युटीवर गेलेला पती मिरगीचा झटका आल्याने अचानक पडून ...
पत्नीचा टाहो : वाडीच्या ‘एमआय क्लब’मधील मृत्यू प्रकरण
नागपूर : मिरगीचा आजार नसताना वाडीच्या ‘एमआय क्लब’मध्ये ड्युटीवर गेलेला पती मिरगीचा झटका आल्याने अचानक पडून गंभीर जखमी झाल्याची बातमी राकेश ठाकूरची पत्नी पूर्णिमाला मिळाली. क्लबमध्ये गेल्यानंतर तेथील मालक आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात हलविण्यासाठी दोन तास कुठलीच मदत केली नाही. अखेर लता मंगेशकर रुग्णालय आणि तेथून मेडिकलमध्ये त्यांना हलविण्यात आले. मेडिकलमध्येही योग्य उपचाराअभावी पतीचा मृत्यू झाला असून पतीच्या मृत्यूस ‘एमआय क्लब’मधील मालक, कर्मचारी कारणीभूत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनवणी राकेशची पत्नी पूर्णिमा ठाकूर करीत आहे.
राकेश ठाकूर (२२) रा. सुदामनगरी हा वाडी येथील ‘एमआय क्लब’मध्ये तंदुरी रोटी बनविण्याचे काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो २२ मे रोजी आपल्या ड्युटीवर गेला. परंतु रात्री ११ च्या सुमारास त्याला अचानक मिरगीचा झटका येऊन पडल्याने तो गंभीर जखमी झाल्याचा निरोप त्याची पत्नी पूर्णिमाला मिळाला.
ती घाईगडबडीत क्लबमध्ये गेली असता राकेशला एका खोलीत बंद करून खोली बाहेरून बंद करून ठेवण्यात आली होती. राकेशजवळ जाताच त्याने डोळे उघडून पत्नीला पाहिले आणि तो बेशुद्ध झाला. विनवणी करूनही क्लबमधील कोणीच रुग्णालयात राकेशला नेण्यासाठी मदत केली नाही. अखेर १ वाजता क्लबच्या मालकाने एका ड्रायव्हरला सोबत दिले.
राकेशला लता मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. तेथून मेडिकलमध्ये हलविण्यात आले. मेडिकलमध्येही फक्त सलाईन आणि आॅक्सिजन लावून कोणतेच उपचार करण्यात आले नसल्याने, दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप राकेशची पत्नी पूर्णिमाने केला आहे. पतीच्या मृत्यूनंतर पूर्णिमाने त्याचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली. परंतु क्लबमधील कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यामुळे सुरुवातीला डॉक्टरांनी शवविच्छेदनास नकार दिला. त्याच्या मृत्यूची नोंदही मेडिकलच्या पोलीस चौकीत करण्यात आली नाही. अखेर रात्री १ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. परंतु आता शवविच्छेदनाचा अहवाल मिळण्यासाठी दोन महिने लागणार असल्याचे पूर्णिमाला सांगण्यात येत आहे. पतीच्या मृत्यूस ‘एमआय क्लब’चे मालक आणि कर्मचारीच दोषी असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आपणास न्याय देण्याची विनवणी पूर्णिमा ठाकूर करीत आहे. (प्रतिनिधी)