दीनदयाल अंत्योदय योजनेत आडकाठी आणणाऱ्या बँकांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:09 AM2021-01-23T04:09:13+5:302021-01-23T04:09:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विशेष साहाय्यता योजना वेळेत कार्यान्वित व्हाव्यात, गरीब, गरजू, ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी सरकारी कार्यालयाच्या, बँकेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष साहाय्यता योजना वेळेत कार्यान्वित व्हाव्यात, गरीब, गरजू, ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी सरकारी कार्यालयाच्या, बँकेच्या फेऱ्या मारायला लागू नयेत. तसेच दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये आडकाठी आणणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समितीची शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बैठक झाली. या बैठकीदरम्यान ते बोलत होते.
जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समितीअंतर्गत जिल्ह्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या किमान ४० योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचे समूह गट तयार करा व त्यांच्यामार्फत योजनांची सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी नागपूर जिल्ह्यात झाली पाहिजे. या समूह गटाचे नेतृत्व खासदार डॉ. विकास महात्मे करतील, अशी घोषणा गडकरी यांनी केली.
या बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना यांसारख्या ४० योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला खा. विकास महात्मे, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार नागो गाणार, प्रवीण दटके, अभिजित वंजारी, कृष्णा खोपडे, समीर मेघे, आशिष जैस्वाल, विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे प्रामुख्याने उपस्थित होते.
पांदण रस्त्यांचे ‘ई-टॅगिंग’ करा
जिल्ह्यातील पांदण रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण करावे व या रस्त्यांचे ई-टॅगिंग करण्यात यावे, असे निर्देश गडकरी यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांसमोर अनेकदा अधिकाऱ्यांकडून अडचणींचा पाढा वाचण्यात येतो. मात्र या लाभार्थ्यांना वेळेत मदत देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सोबतच पात्र लोकांना तत्काळ घरे मिळाली पाहिजेत, अशी सूचनादेखील त्यांनी केली.
टाऊन प्लॅनिंग विभागाबाबत तक्रारी
त्या बैठकीमध्ये टाऊन प्लॅनिंग विभागासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. ही बाब प्रशासनाने गंभीरतेने घेऊन या विभागाच्या कामकाजाला नियंत्रित करण्याचे निर्देशही गडकरी यांनी दिले.