हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:10 AM2021-02-23T04:10:00+5:302021-02-23T04:10:00+5:30
महापौरांचे निर्देश : शांतिनगर केंद्रावर आरटीपीसीआर चाचणी बंद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपाच्या शांतिनगर आरोग्य केंद्रात ...
महापौरांचे निर्देश : शांतिनगर केंद्रावर आरटीपीसीआर चाचणी बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या शांतिनगर आरोग्य केंद्रात आर.टी.पी.सी.आर. चाचणी होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे लक्षात येताच रविवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.
महापौर यांचे परिचित असलेले उमेश ओझा हे कोरोना चाचणी करण्यासाठी गेले असता शांतिनगर येथून त्यांना परत पाठविण्यात आले. रविवारीही तेथे आर.टी.पी.सी.आर. टेस्ट होत नसल्यामुळे ओझा यांना भालदारपुऱ्यात यावे लागले.
याची माहिती मिळताच दयाशंकर तिवारी स्वत: शांतिनगर केंद्रावर पोहोचले. तेथे केवळ ॲन्टीजेन चाचणी सुरू होती. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता कातोरे अनुपस्थित होत्या. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी मास्क घातलेले नव्हते. काही कर्मचाऱ्यांची मुलेही विना मास्कने तेथे उपस्थित होती. महापौरांनी तातडीने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांना दूरध्वनी करून वस्तुस्थितीवर नाराजी व्यक्त केली. तेथे आणि जेथे सुरू नसेल अशा केंद्रावर तातडीने आर.टी.पी.सी.आर. चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.