मतदार यादीतील गोंधळासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा
By योगेश पांडे | Published: May 14, 2024 10:20 PM2024-05-14T22:20:37+5:302024-05-14T22:20:54+5:30
भाजप आमदाराची मागणी : विधानसभेत त्रुटी दूर करण्यासाठी आत्ताच पावले उचला
नागपूर: लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतील घोळामुळे हजारो मतदारांना मतदान करता आले नाही. या मुद्द्यावरून भाजपने परत प्रशासनाविरोधात भूमिका घेतली आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मतदार यादीतील गोंधळासाठी जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत असा प्रकार होऊ नये यासाठी आत्ताच पावले उचलण्याचीदेखील मागणी केली आहे.
खोपडे यांनी भाजपच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन दिले. लोकसभा निवडणुकीअगोदर बीएलओ तसेच आशा वर्कर्सच्या माध्यमातून घराघरात सर्वेक्षण करून मतदार यादीत आवश्यक सुधारणा करण्याची प्रशासनाची जबाबदारी होती; मात्र हे काम योग्य पद्धतीने न झाल्याने अनेक मतदार वंचित राहिले. जे लोक यासाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी खोपडे यांनी केली. अनेक मतदान केंद्रांवर मतदार रांगा लावून मतदानासाठी उभे होते; मात्र प्रशासनातर्फे सावलीसाठी मंडपदेखील टाकण्यात आला नव्हता. एकाच शाळेत सहा ते सात बुथवरील मतदान केंद्र होते.
या अव्यवस्थेमुळे अनेक मतदारांनी पाठ फिरविली असा दावा खोपडे यांनी केला. मी स्वत: एका बुथमधील यादीचे सर्वेक्षण केले. त्यातील ३०० लोक मतदानापासून वंचित राहिले. या सर्वेक्षणाची प्रत प्रशासनाला सोपविली आहे, असे खोपडे यांनी सांगितले. यावेळी मंडळ अध्यक्ष सेतराम सेलोकर, प्रदेश प्रवक्ता चंदन गोस्वामी, माजी नगरसेवक मनीषा धावडे, गजानन अंतूरकर, सुनील सूर्यवंशी, गुड्डू पांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.