कॅनमधून थंड पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 08:46 PM2018-03-13T20:46:49+5:302018-03-13T20:47:01+5:30
मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्नसमारंभ व कार्यक्रमांमध्ये गावागावांत आणि शहरांमध्ये पाण्याच्या कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली केवळ थंड पाण्याची विक्री करण्यात येत आहे. पाण्याची सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्याची मागणी पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.
पाणी खरोखरच शुद्ध आहे का? हा गंभीर मुद्दा आहे. नळ्याच्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता केवळ थंड पाणी आपल्या गळी उतरवले जाते, ही वस्तुस्थिती आहे. याकडे आरोग्य विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यूव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन इत्यादी प्रक्रिया करूनच हे पाणी कॅनद्वारे उपलब्ध करायला हवे. २० लिटर एक कॅन (प्रत्यक्षात १७ लिटर) २० ते ४० रुपयांपर्यंत विकण्यात येते. हा खेळ प्रशासनाच्या लक्षात का येत नाही, असा सवालही ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे. अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कुठलीही चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्रार वारंवार अन्न व औषधी प्रशासन, वैधमापनशास्त्र विभागाकडे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आली आहे. परंतु याची प्रशासन गंभीर दखल घेत नाही, असा आरोपही पांडे यांनी केला आहे.
कॅनमधून पाणी विक्री करणारे कारखाने शहरात गल्लीबोळात आहेत. त्यांच्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापनशास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नाही. थंड पाण्याच्या कॅनची प्रत्यक्षात किंमत किती? विकले जाणारे पाणी आरोग्याला फायद्याचे आहे का? विक्रीचे परवाने आहेत का? कारखान्याला परवानगी कुणी दिली, यासंदर्भात विस्तृत माहिती प्रशासनाने ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गजानन पांडे यांच्यासह प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, अशोक पात्रीकर, सहसंघटनमंत्री नरेंद्र कुळकर्णी, प्रांत महिला प्रमुख तृप्ती आकांत, अॅड. स्मिता देशपांडे, श्रीपाद भट्टलवार, विनोद देशमुख, श्रीपाद हरदास, उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, संध्या पुनियानी, विलास ठोसर आणि इतर पदाधिकारी यांनी केली आहे.