दुहेरी हत्याकांडाच्या तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:03 AM2019-06-29T01:03:54+5:302019-06-29T01:04:42+5:30
बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या चौकशी अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी पत्रकारांनी शुक्रवारी संविधान चौकात आंदोलन केले. यानंतर पत्रकार संघर्ष कृती समितीच्यावतीने हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी आशा पठाण यांना एक निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या चौकशी अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी पत्रकारांनी शुक्रवारी संविधान चौकात आंदोलन केले. यानंतर पत्रकार संघर्ष कृती समितीच्यावतीने हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी आशा पठाण यांना एक निवेदन दिले.
फेब्रुवारी २०१७ मध्ये उषा कांबळे आणि त्यांची अडीच वर्षांची नात राशी कांबळे या आजी नातीची आरोपी गणेश शाहू, त्याची पत्नी गुड़िया शाहू तसेच अंकित आणि सिद्धू नामक साथीदारांनी निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात अपहरण करून हत्या करणे आणि पुरावा नष्ट करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅट्रॉसिटी अॅक्टही या प्रकरणात लावण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त (एसीपी) किशोर सुपारे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान सुपारे यांनी संशयास्पद भूमिका वठविल्यामुळे त्यांच्याविरुद्ध जोरदार आरोप झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडून चौकशीची सूत्रे काढून तत्कालीन पोलीस आयुक्तांनी ती एसीपी राजरत्न बन्सोड यांच्याकडे सोपविली होती. या संबंधाने फिर्यादी रविकांत कांबळे यांनी एसीपी सुपारेविरुद्ध पोलीस आयुक्तांसह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. सुपारे यांनी या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फायदा होईल, अशी भूमिका वठविल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचीही मागणी केली होती. मात्र, सुपारेंविरुद्ध कोणतीही कडक कारवाई झाली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी शुक्रवारी आंदोलन केले.
प्रकरण न्यायप्रविष्ट
सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचे दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले असून, सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम या प्रकरणाची बाजू मांडणार आहेत.