सिंचन निधी मिळवून देण्याची कारवाई तातडीने करा
By admin | Published: February 6, 2016 03:13 AM2016-02-06T03:13:03+5:302016-02-06T03:13:03+5:30
नागपूर जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प कोच्छी बॅरेजला २०० कोटी तसेच पेंच प्रकल्पाच्या कामाकरिता ३०० कोटी त्वरित मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी,...
पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : विकास कामांचा घेतला आढावा
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प कोच्छी बॅरेजला २०० कोटी तसेच पेंच प्रकल्पाच्या कामाकरिता ३०० कोटी त्वरित मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. तसेच सत्रापूर प्रकल्पाकरिता ४२ कोटी मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. याशिवाय सिंचन विभागात लोकल सेक्टर निर्माण झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या कामांचे भौगोलिकदृष्ट्या पूर्ण म्हणजे चालू कामे तसेच प्रस्तावित कामांच्या चित्रफिती तयार करण्याबाबत पालकमंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील जिल्हा सहनिबंधक सहकार, नगर प्रशासन, सिंचन तसेच विविध विभागांच्या विकास कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुनील केदार, आमदार सुधीर पारवे, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, उपायुक्त (सामान्य प्रशासन) अप्पासाहेब धुळाज, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, विदर्भ सिंचन महामंडळ, नागपूर सुधार प्रन्यास, विभागीय आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, मोठे, मध्यम तसेच लघु प्रकल्पांना निधी मिळवून देणे तसेच मामा तलावांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. पाण्याचे सुयोग्य नियोजन करून उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही याबाबत योग्य कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघात एलईडी पथदिवे लावण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. भूमिगत पथदिवे केबल्ससाठी १८ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. याबाबत सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेतला. पुढील कामांचे नियोजन करुन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. यावेळी नगर परिषद, नगर पंचायतीच्या विकास आराखड्याबाबत आढावा घेण्यात आला, त्याचबरोबर नगर परिषदांच्या विकास योजनेबाबत प्रगती अहवाल मागविण्यात आला. विकास योजनेत सूचना, तक्रारींचे निरसन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.(प्रतिनिधी)
जागा मिळाल्यास बकरा मार्केट स्थलांतरित
नागपूर सुधार प्रन्यासने जागा उपलब्ध करून दिल्यास मोमिनपुरा येथील बकरा मार्केट हे कळमना मार्केट येथे स्थलांतरित करण्यात येईल. यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकाऱ्यांसोबत येत्या १२ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. यावेळी बकरा मार्केटच्या स्थानांतरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नगर परिषदेतील रिक्त जागा भरा
आकृतीबंधानुसार नगर परिषदांच्या रिक्त जागा ३१ मार्च २०१६ पर्यंत भरण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. नगर परिषदेकडे असलेला निधी खर्च करण्याबाबत आणि नगरपालिकेच्या विकास आराखड्याची निर्मिती, त्याचप्रमाणे सर्व योजनानिहाय प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांची पुस्तिका तयार करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.