दारू घ्या, चकना घ्या, येथेच प्या अन् नंतर गुन्हे करा, कळमन्यात दारूड्यांना, गुन्हेगारांना खास सेवा
By नरेश डोंगरे | Published: November 9, 2023 08:20 PM2023-11-09T20:20:11+5:302023-11-09T20:21:59+5:30
दारू विक्रेत्यांचा निर्ढावलेपणा अन् पोलिसांची मेहरनजर
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : उपराजधानीतील सर्वात गर्दीचा आणि व्यापार-व्यवसायांच्या दृष्टीने सर्वात मोठा परिसर मानला जाणारा जाणाऱ्या कळमना परिसरात काही दारू विक्रेत्यांकडून दारूडे, गुन्हेगार, समाजकंटकांना खास सेवा दिली जात आहे. समाजमाध्यमावर आलेल्या व्हिडीओतून हा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. दारू विक्रेत्यांचा निर्ढावलेपणा अन् पोलिसांची मेहरनजर यातून दिसून येत आहे.
उत्तररात्रीपासून पहाटेपर्यंतचे काही तास सोडले तर उर्वरित दिवस रात्रीचे सर्व तास हा परिसर सुरू राहतो. विविध प्रांतातील, शहर आणि गावांतील धान्य, फळ आणि भाजीपाला उत्पादकांची आणि वाहनचालकांची तसेच कामगारांची कळमना मार्केटमध्ये रात्रं-दिवस वर्दळ असते. येथे माल दिल्यानंतर, काम आटोपल्यानंतर ते जागा मिळेल त्या ठिकाणी आराम करतात. तर, शहरातील भाजीपाला विकणारे पहाटे ४ वाजतापासून या ठिकाणी गर्दी करतात. अर्थात सर्वच जण पैसे घेऊन येथे पोहचतात किंवा येथून आपल्या मालाचे पैसे घेऊन परत निघतात. दिवस-रात्र येथे पैशाचे लेन-देण होत असल्याने कळमना मार्केट आणि आजुबाजुच्या १ किलोमिटरच्या परिसरात सावज शोधणारे गुन्हेगारही दिवसरात्र संधीच्या शोधात फिरत असतात. दारूचे गुत्ते या समाजकंटकांचे आश्रयस्थान असते. हे माहित असूनही जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्याकडे यावे म्हणून कळमन्यातील काही दारू विक्रेत्यांनी दारूड्यांसाठी वेगवेगळ्या 'सेवा'ची व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्या दुकानातून दारूडे दारूची बाटली घेतात. बाजुलाच उपलब्ध अंडी, चकणा, ग्लास आणि पाण्याची बाटली घेतात आणि दुकानाजवळच बसतात. तेथून तर्राट झाल्यानंतर सैराट सुटतात. बाजुने जाणाऱ्या - येणाऱ्यांशी भांडण करून त्याला लुटण्याचा प्रयत्न करतात. मारहाण करून दुसरेही मोठे गुन्हे करतात.
नेहमीचा आहे त्रास
विशेष म्हणजे, दारूड्यांना, गुन्हेगारांना 'खुली सुट आणि प्रोत्साहन' देणाऱ्या निर्ढावलेल्या दारू व्यावसायिकांना पोलिसांकडून विशेष सुट मिळाल्याचे जाणवते. त्यामुळे कळमन्यात हाणामारी, लुटमारीच्या घटना नेहमीच घडतात. छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांसाठी हा नेहमीचाच त्रास आहे.
व्हिडीओ व्हायरल, कोण घेणार दखल ?
दारू विक्रेत्याकडून समाजकंटकांना मिळणाऱ्या सेवा आणि या अवैध प्रकारामुळे नागिरकांना होणारा प्रचंड त्रास पोलिसांना कसा दिसत नाही, असा प्रश्न आहे. एका त्रस्त नागरिकाने या गंभीर प्रकाराचे फोटो आणि व्हिडीओ काढले. लोकमतच्या हाती हे फोटो आणि व्हिडीओ लागले असून, यातील दारू विक्रेत्यांची सेवा अन् त्याकडे पोलिसांचे कसे दुर्लक्ष होत आहे, ते स्पष्ट दिसून येते.