कोरोनानंतर मधुमेहाने त्रस्त आहात? तुळशीचे पान अन् पनीर फूल घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 02:01 PM2021-10-12T14:01:54+5:302021-10-12T17:42:47+5:30
शरीरातील मेदाचा नाश करणे, भूक वाढविणे, पाचनक्रिया उत्तम करणे, लंग्जची क्षमता वाढविणे, श्वसनाचे आजार दूर करणे, खोकला-सर्दी दूर होणे आदी अनेक उपयुक्त कार्य तुळशीने होतात. तर, पनीर फूल किंवा पनीर डोडा मधुमेही रुग्णांसाठी हे उत्तम मानले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा काळ ओसरत असला तरी कोरोनाबाधितांमध्ये आफ्टर प्रॉब्लेम्स प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यात मधुमेह हा कॉमन आजार असल्याचे दिसून येते. या आजारावर रामबाण उपाय म्हणून प्रत्येकाच्या घरी असलेली तुळस आणि किराणा दुकानात सहज उपलब्ध होणारे पनीर फूल अर्थात पनीर डोडा हे आहेत. मात्र, या औषधांची मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणे गरजेचे आहे. अन्यथा, त्याचे दुष्परिणामही जाणवायला लागतात.
भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपट्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय, ऑक्सिजनचा अहोरात्र पुरवठा करणारे रोप म्हणूनही तुळस महत्त्वाची मानली जाते. शरीरातील मेदाचा नाश करणे, भूक वाढविणे, पाचनक्रिया उत्तम करणे, लंग्जची क्षमता वाढविणे, श्वसनाचे आजार दूर करणे, खोकला-सर्दी दूर होणे आदी अनेक उपयुक्त कार्य तुळशीने होतात. मधुमेहाचा स्तर कमी करणे, पॅनक्रियाजची ताकद वाढवणे आदी कार्य तुळशीमुळे होतात. तुळशी ही ॲण्टीडायबिटीक्स म्हणून सर्वोत्तम आहे.
तुळशीचा उपचार कसा घ्यावा
सकाळी तुळशीचे पान खुडून त्याचा रस तयार करावा. सकाळ-संध्याकाळ २० मिली.पर्यंत घेणे उत्तम. यामुळे, डायबिटिज कंट्रोल तर होतेच. त्याचे अन्य फायदेही आहेत.
मधुमेहावर कारगर पनीर फूल
पनीर फूल किंवा पनीर डोडा हे किराणा दुकानात सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक औषध आहे. मधुमेही रुग्णांसाठी हे सर्वोत्तम मानले जाते. पांढऱ्या रंगाचे अतिशय हलके असे हे फुल आहे.
पनीर फूल कसे घ्यावे
रोज रात्री व सकाळी आठ ते दहा तास पेलाभर पाण्यात भिजू टाकावे. त्यानंतर ते फूल कुचकरून चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यावे. गाळलेले पाणी प्यावे. ही प्रक्रिया ताजी असावी. रात्री भिजू टाकलेले फूल सकाळी व सकाळी भिजू टाकलेले फूल रात्री घ्यावे. यामुळे मधुमेह नियंत्रित होतो.
आवळा, हळद, गुडमार आदी उपयुक्त
यासोबत आवळा-हळद हे मेद कमी करणाऱ्या वस्तू आहेत. हे घेतल्याने मेद मुत्रावाटे निघून जाते. त्यामुळे, इन्शुलिनची प्रक्रिया सुलभ होते. शिवाय, गुडमार/विजेसारचे पेले मिळतात. यात रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी पिल्याने आरोग्यासाठी उत्तम आहे. सप्तपर्ण, सप्तरंगी औषधीही मधुमेहावर उत्तम आहेत. कारले, जांभूळ, कर्कटश्रुंगी, मेथी दाणा, कुटकी याचा चूर्ण घेतल्यास मधुमेह मुळासकट घालवता येतो. यासाठी मात्र आहारतंत्र योग्य असणे गरजेचे आहे.
अति तेथे माती
कोरोनाकाळात अनेकांनी स्वयंपाक घरात तयार केलेला काढा घेतला. अनेकांना त्याचे लाभही झाले. मात्र, ते कसे घ्यावे, किती घ्यावे याचा अंदाज नसल्याने त्याचे दुष्परिणामही नंतर जाणवायला लागले. त्यामुळे, कुठलेही उपचार घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अन्यथा जास्त मात्रा झाली की दुष्परिणाम सुरू होतात.
- डॉ. नीतेश खोंडे, आयुर्वेद तज्ज्ञ