मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:06+5:302021-08-01T04:09:06+5:30
उमरेड : मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांमुळे दुचाकी, चारचाकी चालक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी अपघाताचा मोठा धोका असतानाही ...
उमरेड : मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांमुळे दुचाकी, चारचाकी चालक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी अपघाताचा मोठा धोका असतानाही नगर पालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग झोपी गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करा, अशी मागणी जोर धरत आहे.
सध्या नागपूर-उमरेड चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक असून येथे गिरड, भिवापूर, नागपूर आणि उमरेड येथे ये-जा करण्यासाठी बसथांबा आहे. शिवाय खासगी ट्रॅव्हल्स आणि चारचाकी वाहनांचाही थांबा याच परिसरात असून रात्रंदिवस हा चौक गजबजलेला असतो.
याच चौक परिसरात ‘बीअर बार’च्या दुकानांचा चौफेर पसारा पसरला आहे. यामुळे दिवसभर झिंगणारे, फिरणारे आणि दुचाकी-चारचाकी वाहनांची येजा करणारे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. मोहपा रोड चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक आणि गॅस गोदाम परिसरात राष्ट्रीय महामार्गावरच जनावरांचा ठिय्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. यामुळे सुसाट-भरधाव वेगाने धूम ठोकत पळणाऱ्या वाहनांचा धोका नेहमीच या मार्गावर असतो. शिवाय जनावरांमुळेही अपघाताची शक्यता बळावली आहे. महामार्गालगतच्या अनेकांच्या घरात आणि दुकानात सुद्धा ही जनावरे शिरतात, अशीही बाब माजी नगरसेवक जगदीश राहाटे यांनी व्यक्त केली. या गंभीर समस्येकडे कुणीही लक्ष देत नाही, असा त्यांचा आरोप आहे. तातडीने या जनावरांना ताब्यात घेण्याची मागणी राहाटे यांनी केली आहे.
मुख्य मार्गावरही जनावरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून शहराकडे येणाऱ्या मार्गावर तसेच संत जगनाडे महाराज भिसी नाका चौक, इतवारी मुख्य मार्ग, भाजीबाजार, जुने बसस्थानक आदी परिसरात सुद्ध मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसून येतो. नगर पालिका याकडे दुर्लक्ष करीत असून तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे. नगर पालिकेकडे याबाबत विचारणा केली असता, कंत्राटाचे काम सोपविण्यात आले असून लवकरच तोडगा निघेल, असे सांगण्यात आले. एखादा मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करीत आहात काय, असा सवाल उमरेडकरांचा आहे.