लहान मुलांना जपा; डिहायड्रेशनचा धोका! पारा ४२.१ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 06:31 PM2022-03-31T18:31:06+5:302022-03-31T18:31:38+5:30
Nagpur News उन्हाचा तडका दिवसागणिक वाढत आहे. उष्णतेच्या लाटेने नागपूरकर भाजून निघाले आहेत. बुधवारी पारा ४२.१ सेल्सियस अंशावर गेला होता.
नागपूर : जेव्हा शरीराला आवश्यक पातळीपेक्षाही पाण्याची मात्रा कमी होते, तेव्हा त्या स्थितीला ‘डिहायड्रेशन’ असे म्हणतात. उन्हाळ्यात लहान मुलांना डिहायड्रेशनचा धोका सर्वाधिक असतो. यामुळे याची लक्षणे ओळखणे व साखर, मीठ आणि पाण्याचे मिश्रण असलेले ‘ओआरएस’ देणे फायद्याचे ठरते. जर बाळ आईचे दूध पीत असेल, तर बाळाला थोड्या थोड्या अंतराने दूध पाजण्याचा सल्ला बालरोग डॉक्टरांनी दिला आहे.
- पारा ४२.१ अंशांवर
उन्हाचा तडका दिवसागणिक वाढत आहे. उष्णतेच्या लाटेने नागपूरकर भाजून निघाले आहेत. बुधवारी पारा ४२.१ सेल्सियस अंशावर गेला होता. विशेष म्हणजे, हवामान विभागाने विदर्भात २ ते ३ एप्रिलपर्यंत उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. विशेषत: वाढत्या तापमानापासून लहान बाळांना जपण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कारण, याला ना बोलता येते, ना ते दाखवू शकते. ते बाळ केवळ रडत राहते किंवा निपचीत पडून राहते आणि डिहायड्रेशन ही अशी स्थिती आहे जी वेळीच पूर्ववत झाली नाही तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागू शकतात.
-ही आहेत लक्षणे?
बाळाला उलटी व हगवण होत असल्यास त्याला काहीही खाण्या-पिण्याची इच्छा होत नाही. अशा स्थितीत बाळाच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. अशावेळी बाळाला ‘डिहायड्रेशन’चा धोका होऊ शकतो. बाळाला कमी लघुशंका होणे, तीन तासांपेक्षा जास्त वेळ लघुशंका न येणे, रडल्यावर डोळ्यातून पाणी न येणे, ओठ फाटणे, तोंड सुकणे, थकवा आणि निपचित पडून राहणे, आळस आणि झोप येणे, खूप चिडचिड होणे. श्वासोच्छवास वाढणे ही लक्षणे ‘डिहायड्रेशन’ची आहेत. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचा ठरतो.
-लहान मुलांची काळजी कशी घ्याल?
लहान बाळाला उन्हात नेऊ नये. हवेशीर ठिकाणी ठेवावे. बाळाला सैल कपडे घालावे. बाळाच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून जितके जास्त पाणी पाजाल तेवढे चांगले, पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने बाळाला कोणताही धोका नाही. उलट जेवढे जास्त पाणी शरीरात जाते तेवढे शरीर निरोगी राहते. त्यामुळे दिवसातून बाळाला दर २-३ तासाने पाणी पाजायला हवे. बाळ दुधावर असले तर त्याला थोड्या थोड्या वेळाने पाजत राहायला हवे.
-द्रवपदार्थ देत राहा
शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवणे हाच डिहायड्रेशन दूर करण्याचा सर्वांत सोपा उपाय आहे. डिहायड्रेशन ही घरच्या घरी ठीक केली जाऊ शकणारी समस्या आहे. डिहायड्रेशनची लक्षणे दिसल्यास बाळाला ‘ओरल रिहाइड्रेशन सॉल्यूशन’ अर्थात ‘ओआरएस’ द्यावे. कधीकधी साधे पाणी पुरेसे नसते अशावेळी साखर, मीठ आणि पाण्याचे मिश्रण असलेले पाणी फायद्याचे ठरते. जोवर बाळाच्या मूत्राचा रंग पांढरा स्वच्छ येत नाही तोवर त्याला हळूहळू करून पाणी पाजत राहावे. जर त्याला उलटी होत असले तर थोड्या थोड्या वेळाने पाणी पाजावे. बाळ आईचे दूध पीत असेल तर उत्तम, ते बाळाला पाजावे यामुळे सुद्धा डिहायड्रेशन दूर होते.
- तर, तातडीने डॉक्टरांना दाखवा
जर घरच्या घरी उपचार करून सुद्धा बाळाच्या स्थितीमध्ये काही फरक दिसत नसेल किंवा बाळाला बाळाच्या उलटी वा विष्ठेमध्ये रक्त दिसून येत असेल किंवा बाळ ‘ओआरएस’ प्यायला बघत नसेल आणि नुसती उलटी वा विष्ठा करत असेल तर, वेळीच डॉक्टरांना दाखवा. गरज भासल्यास सलाईन लावून पाण्याची कमतरता दूर करतील.
-डॉ. ज्योती चव्हाण, बालरोग तज्ज्ञ