संमिश्र हवामानात त्वचेची घ्या अशी काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:21 AM2018-11-20T11:21:46+5:302018-11-20T11:27:50+5:30
ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्यात त्वचा विकार वाढत असलेतरी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्यात त्वचा विकार वाढत असलेतरी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणामुळे त्वचा कोरडी पडणे, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदी समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे प्रसिद्ध त्वचाविकार विशेषज्ञ डॉ. नितीन बरडे यांचे म्हणणे आहे.
उन्हाळ्यात त्वचा घामाला नियमितपणे शरीराबाहेर फेकण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या तक्रारी उद्भवत नाहीत. घामामुळे त्वचेची रंध्रे उघडी राहतात. विशेषत: आपण जे चरबीयुक्त पदार्थ खातो. त्यांचा तेलकटपणा रंध्रातून बाहेर पडतो, त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. परंतु, हिवाळ्यात त्वचेतून घाम बाहेर येण्याची प्रक्रिया मंदावते किंवा बंद होत जाते. त्यामुळे त्वचेचे विकार वाढत असल्याचे डॉ. बरडे यांनी सांगितले. त्यांच्यानुसार सध्या कमी जास्त होणाºया थंडीमुळे त्वचा विकाराचे रुग्ण वाढले आहे. जर निरोगी, सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.
सकाळ-सायंकाळी मॉईश्चरायझर लावा
डॉ. बरडे म्हणाले, बदलत्या वातावरणामुळे अनेकवेळा थंडी जाणवत नसली तरी सकाळी व सायंकाळी त्वचेवर मॉईश्चरायझर लावायला हवे. विशेष म्हणजे, चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉईश्चरायझर लावल्यास फायदा होतो. आंघोळीनंतर त्वचेला टॉवेलने रगडू नये. साबणाऐवजी ‘क्लिंजर’ वापरावे. ‘स्क्रब’ क्रिमचा वापर टाळावा. ‘हिटर’मुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे याबाबत काळजी घ्यावी.
भरपूर पाणी प्या
हिवाळ्यात आहाराकडेही योग्य लक्ष द्यायला हवे. आहारात स्निग्ध पदार्थ, भरपूर ताजी फळे, शहाळ्याचे पाणी, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेव्याचा समावेश करायला हवा असे सांगत डॉ. बरडे म्हणाले, थंडीमुळे अनेकजण पाणी कमी पितात. याचा परिणाम आरोग्यावर होतो. यामुळे ऋतु कुठलाही असो त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यायला हवे.
ओठांची विशेष काळजी घ्या
हिवाळ्यात ओठांचा ओलसरपणा टिकून ठेवणे आवश्यक आहे. ओठाची त्वचा खूप नाजूक असल्याने त्यावर हवा आणि थंड वातावरणाचा थेट प्रभाव पडतो. यामुळे वारंवार ओठांना जीभ लावू नये.
ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यामुळे ओठ फुटण्यापूर्वी व्हॅसलिन किंवा ‘लिप बाम’चा वापर नियमित करायला हवा, असेही डॉ. बरडे म्हणाले.