मुलांना दुचाकीवरून नेताना घ्या काळजी, अन्यथा दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 08:00 AM2022-02-19T08:00:00+5:302022-02-19T08:00:17+5:30
Nagpur News मोटारसायकलवर मागे बसलेल्या लहान मुलांनाही हेल्मेट वापरणे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बंधनकारक केले आहे. ४ वर्षांखालील मूल दुचाकीवर बसलेले असेल तर त्याला ‘क्रॅश हेल्मेट’ घालणे तसेच गाडीला ‘सेफ्टी हार्नेस’ लावणे बंधनकारक असणार आहे.
नागपूर : मोटारसायकलवर मागे बसलेल्या लहान मुलांनाही हेल्मेट वापरणे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार, ४ वर्षांखालील मूल दुचाकीवर बसलेले असेल तर त्याला ‘क्रॅश हेल्मेट’ घालणे तसेच गाडीला ‘सेफ्टी हार्नेस’ लावणे बंधनकारक असणार आहे.
केंद्रीय मोटार वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, २०२२ नुसार मोटारसायकल चालकाने हेल्मेट आणि ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हार्नेस बेल्ट वापरणे बंधनकारक असणार आहे. तसेच वाहनाचा वेग केवळ ४० किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवणे आवश्यक असणार आहे. दुचाकींसाठी नव्याने लागू करण्यात आलेल्या या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाऊ शकते.
- काय आहे क्रॅश हेल्मेट
‘क्रॅश हेल्मेट’मध्ये मुलाचे डोके पूर्णपणे कव्हर झालेले असते. ते नुसते टोपीसारखे नसते. यामुळे मूल खाली पडले तरी डोक्याला गंभीर इजा होण्याचा धोका कमी असतो. केंद्र सरकारने कंपन्यांना यापूर्वीच क्रॅश हेल्मेट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- काय आहे हार्नेस बेल्ट
‘सेफ्टी हार्नेस’ हे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीसोबत मुलांना बांधून ठेवते. ते ‘ॲडजस्टेबल जॅकेट’सारखे असते. यामुळे अचानक झटका बसला तरी मूल खाली पडत नाही. विशेष म्हणजे, शाळेतील बॅगप्रमाणे हा बेल्ट लहान मुलांना घालता येतो.
-तर हजाराचा दंड, लायसन्सही जप्त
या नियमाचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांचा वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) निलंबित केला जाऊ शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने चांगला निर्णय असल्याचे बोलले जात आहे.
-वेग ४०च्या आतच हवा
दुचाकींवर मागे बसणाऱ्या मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ‘क्रॅश हेल्मेट’, ‘सेफ्टी हार्नेस’ सोबतच वाहनाचा वेग केवळ ४० किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवणे आवश्यक असणार आहे. या संदर्भात केंद्रीय मोटार वाहन कायद्यात तशी सुधारणा करण्यात आली आहे.
-सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे
९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलांना ‘क्रॅश हेल्मेट’ घालणे, ‘सेफ्टी हार्नेस’ बांधणे व दुचाकीचा वेग ४० किमी प्रतिसाद मर्यादित ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यामुळे दुर्घटना कमी होतील. या नियमाची अंमलबजावणी १५ फेब्रुवारी २०२३ पासून होणार आहे.
-डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त परिवहन विभाग