देशाला प्रगतिपथावर न्यावे
By admin | Published: September 28, 2014 01:04 AM2014-09-28T01:04:41+5:302014-09-28T01:04:41+5:30
भौतिक सुखासाठी आपण दोन पावले पुढे जातो, हे खरे आहे. हे करताना आपली नैतिकता सोडू नये. आम्ही मातांचा किती आदर करतो, हे पाहण्याची गरज आहे. दात्याने काय दिले हे सांगू नये,
जी.एम. टावरी यांचे प्रतिपादन : महावीर इंटरनॅशनलच्या नवीन चमूचे पदग्रहण
नागपूर : भौतिक सुखासाठी आपण दोन पावले पुढे जातो, हे खरे आहे. हे करताना आपली नैतिकता सोडू नये. आम्ही मातांचा किती आदर करतो, हे पाहण्याची गरज आहे. दात्याने काय दिले हे सांगू नये, असे सांगताना देशाला प्रगतिपथावर नेण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट मत डॉ. जी.एम. टावरी यांनी येथे मांडले.
समाजसेवा हेच ब्रीद असलेल्या महावीर इंटरनॅशनल, नागपूर सेंटरच्या दोन वर्षीय नवीन चमूचा पदग्रहण समारंभ रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये शनिवारी पार पडला. मुख्य पाहुणे म्हणून डॉ. टावरी बोलत होते. मंचावर विशेष अतिथी विजय बापना यांच्यासह मावळते अध्यक्ष सुरेश राठी, नवनिर्वाचित अध्यक्ष सविता अजय संचेती, सचिव भरत पारेख, नितीन शाह होते. यावेळी नवीन ३५ सदस्यांचा सत्कार आणि त्यांना शपथ देण्यात आली.
विजय बापना म्हणाले की, हे व्यासपीठ समाजसेवेचे आहे. आपल्याला मिळालेल्या उत्पन्नापैकी काही वाटा समाजसेवेसाठी खर्च करा. सध्या नागपूर सेंटर प्रगतिपथावर असून समाज कार्यात पुढे राहावे. नवनिर्वाचित अध्यक्षा सविता संचेती म्हणाल्या की, सेंटरला नवीन ओळख देऊन प्रगतिपथावर नेणार आहे. याकामी सर्व सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास आहे. सामाजिक उपक्रमात सहकार्यासाठी त्यांनी कुटुंबीयांचे आभार मानले आणि दिवाळीत होणारे कार्यक्रम व नवीन उपक्रमांची रूपरेषा सांगितली. प्रारंभी मावळते अध्यक्ष सुरेश राठी यांनी दोन वर्षांतील कार्यक्रमांची माहिती दिली आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले.
संचालन सोनल सिंघवी आणि अर्चना जव्हेरी यांनी केले तर सचिव भरत पारेख यांनी आभार मानले.पदग्रहण समारंभात खा. अजय संचेती, सुनील रायसोनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संस्थेची नवीन कार्यकारिणी
अध्यक्षा-सविता संचेती, सचिव-भरत पारेख, उपाध्यक्ष-शिव अग्रवाल, कोषाध्यक्ष तुषार सिंघवी, सहसचिव अरविंद गोलछा व विनीता माहेश्वरी. संचालक अर्चना जव्हेरी, प्रीमी सेठ, अजय गांधी, प्रकाश खेमका, अश्विन गोलछा, विनय माहेश्वरी.
डायलिसिस सेंटर सुरू करणार
संस्थेतर्फे डायलिसिस सेंटर ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. सेंटरसाठी सुनील रायसोनी ११ लाख रुपये देणार आहेत. विजय बापना यांनी आर्थिक मदतीची घोषणा करताना सदस्यांना सहकार्याचे आवाहन केले.