तीन दिवसात सोक्षमोक्ष लावा : पाराशर यांचे पोलिसांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:58 PM2018-03-05T23:58:52+5:302018-03-05T23:59:14+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागातील एका माजी विद्यार्थिनीने माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर आणि विभागप्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर केलेल्या विनयभंगाच्या आरोपाचा शोध लावण्यात अद्याप अंबाझरी पोलिसांना यश आले नसले तरी या प्रकरणाचा तीन दिवसात सोक्षमोक्ष लावा अन्यथा याप्रकरणी आपण न्यायालयात दाद मागू, असे पत्र सोमवारी डॉ. पाराशर यांनी अंबाझरी पोलिसांना सादर केल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागातील एका माजी विद्यार्थिनीने माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर आणि विभागप्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर केलेल्या विनयभंगाच्या आरोपाचा शोध लावण्यात अद्याप अंबाझरी पोलिसांना यश आले नसले तरी या प्रकरणाचा तीन दिवसात सोक्षमोक्ष लावा अन्यथा याप्रकरणी आपण न्यायालयात दाद मागू, असे पत्र सोमवारी डॉ. पाराशर यांनी अंबाझरी पोलिसांना सादर केल्याची माहिती आहे.
तक्रारकर्त्या विद्यार्थिनीने तिच्या पोलीस तक्रारीत केलेल्या सर्व आरोपांचे खंडन करीत आपल्याला बदनाम करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचे पाराशर यांनी म्हटले आहे. आपण २ जुलै २०१६ पासून विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या विभागप्रमुखाच्या कक्षात बसून राहायचो, असे तक्रारीत म्हटले आहे. मुळात ३१ जुलै २०१३ रोजी विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर भारत सरकारने आपली इंडियन मॅरिटाइम युनिव्हर्सिटी येथे जून २०१५ मध्ये प्र-कुलगुरूपदी नियुक्ती केली होती. जुलै २०१६ पर्यंत या विद्यापीठाच्या मुंबई येथील कार्यालयात माझे मुख्यालय होते. तिथे मी पूर्णवेळ कार्यरत होतो. तशी माहिती केंद्र सरकारच्या दस्तऐवजात उपलब्ध आहे. अशात तक्रारकर्त्याच्या आरोपानुसार मी विभागप्रमुखाच्या कक्षात बसायचो, यात काहीएक तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच काय तर २० मार्च २०१७ रोजी तक्रारकर्त्याने विनयभंगाची घटना झाल्याचे म्हटले आहे. मुळात १६ ते २२ मार्च २०१७ या काळात मी नागपुरात नव्हतो. यासंदर्भात धारवाड विद्यापीठाचे उपस्थिती पत्र आणि विमान प्रवासाच्या तिकिटाचे पुरावेही पाराशर यांनी पोलिसांकडे जमा करीत या प्रकरणात आपले नाव वगळण्यात यावे अन्यथा आपण झालेल्या तक्रारीविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास मोकळे राहू, असेही पाराशर यांनी या पत्रात म्हटले आहे.