संत्रा व मोसंबी फळगळतीवर तत्काळ उपाययोजना करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:20+5:302021-08-24T04:12:20+5:30
नागपूर : काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादकांना मागील वर्षापासून दोन्ही बहारांमधील फळगळतीचा सामना करावा लागत ...
नागपूर : काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादकांना मागील वर्षापासून दोन्ही बहारांमधील फळगळतीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे चर्चासत्र घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सोमवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जि.प. च्या अध्यक्षा रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, कृषी विभागाचे सहसंचालक रवींद्र भोसले, प्रगतिशील शेतकरी दिनेश ठाकरे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
संत्रा व मोसंबीच्या फळबागांवर बुरशीजन्य कीटकांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत करण्यात येणार असल्याचे केदार म्हणाले. संत्रा व मोसंबीवरील रोगावरील निष्कर्षासाठी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करून उपाययोजनांबाबत अहवाल सादर करावा आणि संत्रा व मोसंबी उत्पादकांचे प्रश्न सोडवावेत. कृषी विभागाने तत्काळ रोगावरील औषध उपलब्ध करून द्यावे व कीटकनाशक फवारणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.