डेंग्यू व स्क्रब टायफस नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:18 PM2018-09-20T23:18:04+5:302018-09-20T23:19:38+5:30
नागपूर शहर व परिसरात डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू, फायलेरिया व इतर जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. अशा आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा, परिसरात स्वच्छता राहावी यासाठी नागरिकांचे सहकार्य घ्या, संसर्गजन्य आजारांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुुरुवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर व परिसरात डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू, फायलेरिया व इतर जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. अशा आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा, परिसरात स्वच्छता राहावी यासाठी नागरिकांचे सहकार्य घ्या, संसर्गजन्य आजारांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुुरुवारी दिले.
नागपूर शहरात संसर्गजन्य रोगांचा वाढता प्रकोप लक्षात घेता महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयोजित बैठकीत रणजित पाटील यांनी उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, रवींद्र ठाकरे, अप्पर आयुक्त राम जोशी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
रणजित पाटील म्हणाले, डेंग्यू, स्क्रब टायफस व स्वाईन फ्लू अशा आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर उपययोजना करतो. परंतु आजार होऊ नयेत, यासाठीही तशाच उपाययोजना करण्याची गरज आहे. परिसरातील स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. आजारांपासून बचावासाठी जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा उपयोग करून नागरिकांना आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व शहरातील विविध सेवाभावी संस्थांचा सहकार्य घ्या, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देऊ न जनजागृतीच्या माध्यमातून योजना कार्यान्वित करा.
महापालिकेच्या रुग्णालयाबाबतची नागरिकांची धारणा बदलण्यासाठी रुग्णालयात रुग्णांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. उत्कृष्ट आरोग्य सुविधा उपलब्ध करा, ‘मॉडेल हॉस्पिटल’ तयार करून नागरिकांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी खासगी डॉक्टरांना महापालिका रुग्णालयात बोलवा, असे निर्देश पाटील यांनी दिले.
डेंग्यू, स्क्रब टायफस व स्वाईन फ्लू आजारांचा प्रकोप वाढत्या रुग्णांवरून लक्षात येतो. महापालिका किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºयांची संख्याही अधिक असते. त्यामुळे अशा रुग्णांची माहिती व त्यांच्या आजाराबाबतचा अहवाल खासगी रुग्णालये व पॅथालॉजीकडून घेण्यात यावा. शहरातील दहाही झोनचे आरोग्य अधिकारी, समन्वयक, निरीक्षक या सर्वांची प्रत्येक आठवड्याला बैठक घेऊन झोननिहाय आजार, स्वच्छता याबाबतीत आढावा घेऊ न उपायोजना करण्याचे निर्देश रणजित पाटील यांनी दिले.
पाटील यांच्या निर्देशानुसार तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देेश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. अनिल चिव्हाणे यांनी नागपूर शहरातील महापालिका, शासकीय व खासगी दवाखान्यांबाबतची सविस्तर माहिती दिली तसेच संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली.
बैठकीला उपसत्तापक्ष नेत्या वर्षा ठाकरे, उपसत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, नगरसेविका दिव्या धुरडे, निगम आयुक्त उपायुक्त नितीन कापडनीस, आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक सेवा आरोग्य सेवा डॉ. मिलिंद गणवीर, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, सर्व झोनचे झोनल आरोग्य अधिकारी व मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.