पैसे घेतात, पण कचरा उचलत नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:14 PM2019-05-15T12:14:30+5:302019-05-15T12:16:22+5:30
शहरातील हॉस्पिटलमधून निघणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जाते. परंतु कचरा गोळा करण्यासाठी म्युनिसिपल सॉलिड वेस्ट(एमएसडब्ल्यू)च्या गाड्या नियमित येत नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील हॉस्पिटलमधून निघणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जाते. परंतु कचरा गोळा करण्यासाठी म्युनिसिपल सॉलिड वेस्ट(एमएसडब्ल्यू)च्या गाड्या नियमित येत नाहीत. वास्तविक महापालिका हॉस्पिटलमधून निघणारा कचरा उचलण्यासाठी शुल्क वसूल करते. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे(दवाखाने) शहरातील डॉक्टरांनी अनेकदा तक्रारी केल्या, परंतु याची दखल घेतली जात नाही.
‘लोकमत’ने धंतोली व हनुमाननगर झोनच्या कार्यक्षेत्रातील हॉस्पिटलच्या कचऱ्यामुळे होणारी घाण व महापालिके चे दुर्लक्ष यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही.
दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशनशी संबंधित डॉक्टरांनी मेडिकल वेस्टसंदर्भात केलेल्या तक्रारींची माहिती दिली.
कनक रिसोर्सेस कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. महाराष्ट्राच्या आयएमएच्या कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका डॉक्टरांनी सांगितले की, पाच बेडच्या रुग्णालयासाठी सुपर्ब हायजेनिक दर तीन महिन्यात २२०० रुपये घेतात, मात्र त्यांच्या गाड्या नियमित येतात. तर एमएसडब्ल्यू वर्षाला तीन हजार रुपये जमा करूनही कचरा उचलण्यासाठी गाड्या पाठवत नाही.
यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे यासंदर्भात तक्रारी केल्या, परंतु ते आपली जबाबदारी झटकतात. हे काम स्वच्छता विभागाचे असल्याचे सांगतात. यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
तक्रारी आल्या तर त्यांचा निपटारा केला जात असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागा(स्वच्छता)च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. शुल्क आकारून सेवा देण्याचा प्रश्नच नाही. जर कुणाची तक्रार असेल तर त्यांनी ती योग्य विभागाकडे करावी. अशी अनेक प्रकरणे निकाली काढलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
दररोज निघतो तीन टन जैव कचरा
शहरातील हॉस्पिटलमधून दररोज अडीच ते तीन टन बायोमेडिकल वेस्ट (जैव कचरा) निघतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सुपर्ब हायजेनिक यांच्याकडे सोपविली आहे. भांडेवाडी येथे या कंपनीचा प्लांट आहे. येथे जैव कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.