आधी सॅनिटायझर मशीन घ्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:16+5:302021-07-02T04:07:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : शाळा कधी सुरू होणार आणि वर्ग कधी भरणार, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी शिक्षक, ...

Take the sanitizer machine first! | आधी सॅनिटायझर मशीन घ्याच!

आधी सॅनिटायझर मशीन घ्याच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : शाळा कधी सुरू होणार आणि वर्ग कधी भरणार, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी शिक्षक, शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे नाहीच. कोरोना महामारीमुळे ही कठीण परिस्थिती उद्भवली आहे. सध्या शिक्षक स्वत:ची हजेरी लावत आहेत. अशातच उमरेड तालुक्यात शाळाशाळांमध्ये जाऊन संबंधित कंपनीचे विक्रेते सॅनिटायझर मशीनचा ‘डेमो’ करीत सुटले आहेत. केवळ ‘डेमो’पर्यंतच ही बाब राहिलेली नसून शाळा जेव्हा सुरू व्हायची तेव्हा होईल, आधी सॅनिटायझर मशीन घ्याच! असा आग्रह, हट्ट आणि सरतेशेवटी दबावतंत्राचाही वापर यासाठी शिक्षकांवर केला जात असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.

वर्षभरापूर्वी गणवेश खरेदीचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला होता. आता सॅनिटायझर मशीनवरून शिक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, या ठिकाणी एका खोलीत या सॅनिटायझर मशीन दिसून आल्या. याबाबतची अधिक माहिती काढली असता, शाळांना मिळणाऱ्या सादिल अनुदानाच्या (४ टक्के) रकमेतून सदर कंपनीचे सॅनिटायझर घ्या, अशा शाब्दिक सूचना असल्याचे समजते. सादिल अनुदानाची रक्कम दुरुस्ती, इलेक्ट्रिक बिल, अग्निशमन यंत्र, स्वच्छता यावर खर्च केली जाते. शिक्षकांच्या संख्येनुसार सदर अनुदान शाळांना प्राप्त होत असते. तालुक्यात प्राथमिक, उच्च प्राथमिक तथा माध्यमिक शाळांची संख्या १२२ आहे.

या रकमेतूनच ही मशीन घेण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावणे सुरू असल्याचे बोलले जाते. याबाबत पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्याशी चर्चा केली असता, मला याप्रकरणी काहीही माहीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली असता, कोणत्या तरी एका कंत्राटदाराने मशीन ठेवल्या. सहकार्याच्या भावनेतून आमच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली असेल, या सॅनिटायझर विक्रीशी शिक्षण विभागाचा कोणताही संबंध नाही, असे ते बोलले. आम्ही सॅनिटायझरबाबतच्या कोणत्याही सूचना शिक्षकांना दिल्या नसल्याचीही बाब दोघांनीही स्पष्ट केली.

Web Title: Take the sanitizer machine first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.