हे घ्या, गढूळ पाणी पिऊन दाखवाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:33+5:302021-06-22T04:07:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : मागील काही दिवसापासून गांगापूर, कावरापेठ, बुधवारी आणि मंगळवारी परिसरात गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : मागील काही दिवसापासून गांगापूर, कावरापेठ, बुधवारी आणि मंगळवारी परिसरात गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे. दररोज होणाऱ्या या त्रासामुळे नागरिक कमालीचे संतापले आणि परिसरातील काही तरुणांनी हेच गढूळ पाणी नगरपालिकेत घेऊन जात आम्हास पुरवठा करीत असलेले गढूळ पाणी तुम्ही पिऊन दाखवाच! अशी गांधीगिरी केली. बाटलीमधील गढूळ पाणी बघून अधिकारी, कर्मचारी अवाक् झाले. दुसरीकडे पालिकेच्या या कारभारावर सडकून संतापही व्यक्त झाला.
उमरेड पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, पालिकेचे उपाध्यक्ष गंगाधर फलके यांनी या तरुणांची समस्या ऐकून घेतली. मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: जलशुद्धीकरण केंद्रात तातडीने भेट देत पाहणी केली. मागील काही दिवसापासून शहरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम सुरू आहे. या टाक्यांमध्ये बऱ्याच वर्षापासूनचा गाळ साचलेला आहे. टाक्या योग्यवेळी बऱ्याच वर्षांपासून स्वच्छ केल्या गेला नाही, या गंभीर बाबीकडे लोकमतने लक्ष वेधले होते. या टाक्या स्वच्छ करीत असताना योग्य काळजी घेण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांचा आहे. शिवाय, रेती आणि स्टोन मागील काही वर्षांपासून बदलविण्यात आले नाही, अशीही बाब समोर येत आहे.
पालिकेने योग्य काळजी घ्यावी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये, अन्यथा आंदोलनाचा इशारा या तरुणांनी यावेळी दिला. संतोष महाजन यांच्या नेतृत्वात संदीप कांबळे, अजय जुनघरे, रूपेश मोंगसे, मनीष चौधरी, नागेश राहाटे, नीतेश जुनघरे, सौरभ दहाघाने, नीलेश चौधरी, वैभव दहाघाने, शुभम कुंभरे, भूषण चौधरी, सचिन बाळबुधे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.