गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करा : अश्विन मुदगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 09:59 PM2019-07-31T21:59:57+5:302019-07-31T22:00:55+5:30
जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून, शेतीपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र भविष्यात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी आणि मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीवरील नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून, शेतीपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र भविष्यात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी आणि मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीवरील नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांना दिले.
छत्रपती सभागृहात आयोजित कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणीबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, सीआयसीआरचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. वासनिक, डॉ. विश्लेष नगरारे, प्रा. डॉ. राहुल वडस्कर, डॉ. अनिल मोरे, प्रा. राम गावंडे, प्र. दि. देशमुख आणि तंत्र अधिकारी अर्चना कोचरे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जिल्ह्यात झालेल्या विविध पीक पेरणीचा आढावा घेतला. प्रामुख्याने कापूस, धान, तूर, मका, संत्रा, ऊस आदी पिकांखालील क्षेत्र, पुढील काही दिवसांमध्ये पावसाने अल्पविश्रांती घेतल्यास धान रोवणीचा वेग वाढेल. त्यामुळे जिल्ह्यातील धान पिकांखालील क्षेत्रात वाढ होईल. त्याची आठवडाभरात पिकांखालील क्षेत्रात होणाऱ्या वाढीची माहिती संकलित करावी. तसेच भविष्यात पावसाने दडी मारली अथवा अतिवृष्टी झाल्यास पीकविमा, पिकांवर पडणारे रोग, कापूस आणि मका पिकांवर गुलाबी बोंड अळी आणि अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होणारच नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
गुजरात राज्याच्या धर्तीवर जिनिंग प्रेसिंग आणि कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. औषधे, खते आणि बी-बियाणे तपासणीसाठी भरारी पथके नेमली जातात, तशी भरारी पथके नेमावीत. या पथकांनी उद्यापासून जिनींग प्रेसिंग कारखान्यांमध्ये बोंडअळी नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप लावले आहेत की नाहीत. तेथील कीडयुक्त कापूस बियाणे नष्ट केल्याची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिलेत.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आतापर्यंत जिल्ह्यात झालेली पीक पेरणी आणि पुढील आठवडाभरात पिकाखालील क्षेत्रात वाढ होईल, याबाबतचा आढावा घेतला.
गावसभा व शेतीशाळा घ्या
गुलाबी बोंड अळी आणि अमेरिकन लष्करी अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात गावसभा आणि शेतीशाळा घ्याव्यात. तसेच कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकांनी शेतीशाळांच्या माध्यमातून पतंग पकडण्यासाठी फेरोमन सापळे, ल्यूर्स, ट्रायकोकार्डबाबत मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावे. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीसाठी निंबोळी पावडर आणि पावडरपासून अर्क बनविण्यासाठी जिल्ह्यातील महिला बचत गटांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर निंबोळी विक्री केंद्राचे काम द्यावे. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.