हिवाळी अधिवेशन नागपुरातच घ्या : भाजपच्या आमदारांची स्पष्ट भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 08:04 PM2020-11-06T20:04:08+5:302020-11-06T20:07:08+5:30

BJP MLAs, Winter session in Nagpur ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घेण्यासंदर्भात सरकारी हालचाली सुरू असताना शहरातील भाजप उमेदवारांनी अधिवेशनाच्या समर्थनार्थ ठोस भूमिका घेतली आहे.

Take the winter session in Nagpur itself: clear role of BJP MLAs | हिवाळी अधिवेशन नागपुरातच घ्या : भाजपच्या आमदारांची स्पष्ट भूमिका

हिवाळी अधिवेशन नागपुरातच घ्या : भाजपच्या आमदारांची स्पष्ट भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देविधानभवन परिसरात खबरदारीचे उपाय हवेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घेण्यासंदर्भात सरकारी हालचाली सुरू असताना शहरातील भाजप उमेदवारांनी अधिवेशनाच्या समर्थनार्थ ठोस भूमिका घेतली आहे. २०१९ या वर्षात नागपुरात एकही अधिवेशन झालेले नाही. विदर्भातील जनतेचे असंख्य प्रश्न सरकारसमोर मांडायचे आहे. शिवाय नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन हा नागपूरचा हक्कच आहे. त्यामुळे ‘कोरोना’ असला तरी खबरदारीच्या उपाययोजना करुन अधिवेशन नागपुरातच घेण्यात यावे, असा भाजप आमदारांचा सूर आहे.

नागपुरात अधिवेशन घेण्यात येऊ नये हा मुद्दा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी सर्वात अगोदर उपस्थित केला होता. ‘कोरोना’ची स्थिती लक्षात घेता तो निधी आरोग्य यंत्रणेला देण्यात यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. सरकारकडून अद्यापही नेमकी भूमिका मांडण्यात आलेली नाही. अधिवेशनाला एक महिना बाकी असताना अद्यापही तयारीने हवा तसा वेग घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांनी अधिवेशन नागपुरात घेण्याचा मुद्दा लावून धरला आहे. ‘कोरोना’ असतानादेखील संसदेचे अधिवेशन झाले. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सर्व उपाययोजना करुन अधिवेशन घ्यावे व विदर्भाला न्याय मिळावा असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पूर्ण खबरदारीसह अधिवेशन हवे

हिवाळी अधिवेशन नागपुरातच व्हायला हवे. यासंदर्भात आमच्या पक्षाची जी भूमिका असेल त्याचेच आम्ही समर्थन करु. बºयाच प्रयत्नांनंतर नागपुरातील ‘कोरोना’ रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यात यश आले आहे. त्यामुळे अधिवेशन नागपुरात झाले तर खबरदारीच्या सर्व उपाययोजना झाल्या पाहिजे.

प्रवीण दटके, भाजप शहराध्यक्ष व आमदार, विधान परिषद

तीन आठवडे अधिवेशन चालवावे

अधिवेशन केवळ दोन दिवसांपुरतेच घेण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती कळाली आहे. असे होत असेल तर कोट्यवधींचा खर्च करुन अधिवेशनाचा ‘फार्स’ करण्याची काहीच आवश्यकता नाही. जर अधिवेशन झालेच तर ते कमीत कमी तीन आठवडे चालेल याची शाश्वती असली पाहिजे. भाजपकडे सरकारची कोंडी करण्यासाठी भरपूर मुद्दे आहेत. ‘कोरोना’ संसर्ग नागपुरात कमी होत असून अधिवेशन झाल्यास काहीच हरकत नाही.

-कृष्णा खोपडे, आमदार, भाजप

नागपूर कराराचे पालन व्हावे

नागपूर करारानुसार वर्षातील एक अधिवेशन राज्याच्या उपराजधानीत होणे अनिवार्य आहे. मुंबईत झालेल्या अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात आला होता. शिवाय ‘कोरोना’पासून सुरक्षेसाठी उपाययोजनादेखील करण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर नागपुरातदेखील कमीत कमी दोन आठवड्यांचे अधिवेशन झाले पाहिजे.

-मोहन मते, आमदार, भाजप

विदर्भातील जनतेचे सरकारकडेच लक्ष

सरकारकडून जनतेला अनेक मुद्यावर उत्तर हवे आहे. नागपुरात ‘कोरोना’ नियंत्रणात येत आहे. अधिवेशनामुळे जर खरोखर ‘कोरोना’चा प्रसार होणार असेल तर तो मुंबईतदेखील होईल. विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष अधिवेशनाकडे लागले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करुन अधिवेशन नागपुरातच घ्यावे.

- विकास कुंभारे, आमदार, भाजप

Web Title: Take the winter session in Nagpur itself: clear role of BJP MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.