‘घेऊन जा ऽऽ गे मारबत...
By admin | Published: September 14, 2015 03:06 AM2015-09-14T03:06:19+5:302015-09-14T03:06:19+5:30
डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई...ढोलताशांचा कर्णकर्कश्श गजर...मनातल्या भावनांचा निचरा करणाऱ्या दमदार घोषणा...बेधुंद नृत्याचा जल्लोष...
नागपूर : डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई...ढोलताशांचा कर्णकर्कश्श गजर...मनातल्या भावनांचा निचरा करणाऱ्या दमदार घोषणा...बेधुंद नृत्याचा जल्लोष...आणि काही नेत्यांवरचा राग व्यक्त करताना त्यांच्या नावाने काढण्यात आलेल्या बडग्यांना चपलांनी मारण्याचे सुख अनुभवत आजचा मारबत उत्सव रंगला. तब्बल १३४ वर्षांपासून अव्याहतपणे चालू असणारी ही परंपरा आहे. केवळ नागपुरातच काढण्यात येणाऱ्या या मारबत उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला राग आणि संताप व्यक्त होत होता. सामान्य माणसांना व्यक्त होण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळत नाही, पण मारबत उत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांना त्यांच्या पद्धतीने अभिव्यक्त होण्याची संधी देणारा हा लोकोत्सव लोकांच्या प्रचंड प्रतिसादाने गाजला. प्रचंड गर्दी, उंट, घोडे, संदल, वाजंत्रीच्या तालावर नृत्याचा आनंद घेत प्रामुख्याने युवकांनी या उत्सवात लक्षणीय सहभाग घेतला.
या काळात रोगराई वाढते. त्यामुळे साधारणत: दरवर्षीच ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’ अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो. मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे. यात पिवळी आणि काळी मारबत विशेष महत्त्वाची आहे. मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडल्या जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर समस्या, संकटे येत नाहीत, अशी आख्यायिका आहे. याच संदर्भाने नागपुरातही पिवळी मारबत काढण्यात येते. या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्याने शहरातील कुरीती आणि संकटे संपतात, अशी मान्यता आहे.
१८८१ साली नागपूरच्या राजे भोसले घराण्यातील बकाबाई नावाच्या राणीने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राजे भोसलेंचा पराभव झाला. त्यानंतर भोसले घराण्याला वाईट दिवसांना सामोरे जावे लागले म्हणून बकाबाईच्या नावाने काळी मारबत काढण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर जनतेच्या मनातील आक्रोश व्यक्त होताना यात बडग्या उत्सवालाही प्रारंभ झाला.
पाडव्याचा सण साजरा करताना अनेक मंडळांनी आपल्या मनातील संताप व्यक्त करताना विविध बडग्यांच्या माध्यमातून अनेक मुद्यांवर आपला आक्रोश व्यक्त केला. यात दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान आणि युद्धासंदर्भात सुरू असलेली त्याची मुजोरी याचा निषेध, जनतेवर बुरे दिन लादणारे सरकार, वेगळ्या विदर्भाच्या नावाने जनतेशी दगा करणारे नेते, विदर्भद्रोही लोक, इतकेच नव्हे तर एसएनडीएलसह शहरातील स्थानिक प्रश्नांना घेऊनसुद्धा बडगे काढण्यात आले होते. याप्रसंगी विविध बडग्यांवर अनेक फलक लिहून काही वाक्ये लिहिण्यात आली होती. एकूणच केवळ नागपूरकरच नव्हे तर विदर्भ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील नागरिकही या उत्सवासाठी खास नागपुरात आले होते. त्यांच्या उपस्थितीने हा उत्सव रंगला.
जनतेशी धोका करणाऱ्यांचा बडग्या
अनेक पक्षांच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन देत सत्तेत स्थान मिळविले. प्रत्यक्षात सत्ता मिळाल्यावर त्यांना विदर्भाच्या मुद्याचा आणि विकासाचाही विसरच पडला. त्याचा संताप बडग्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर दोन बडगे काढण्यात आले. ‘वेगळ्या विदर्भाच्या नावाने धोकेबाजी करणाऱ्या विदर्भवाद्यांना घेऊन जा ऽऽ गे मारबत’ असेही आवाहन करण्यात आले. हा बडगा विदर्भ क्रांती दल व युवा शक्ती बडग्या उत्सव मंडळाच्यावतीने काढण्यात आला होता.
महागाईवर प्रहार करणारा बडग्या
‘अब अच्छे दिन आनेवाले है’ असे सांगतानाच देशभरातील जनतेला आश्वासन देत सत्ता काबीज करण्यात आली. प्रत्यक्षात सत्ता मिळाल्यावर अद्यापही महागाई नियंत्रणात आली नाही. महागाई वाढल्याबद्दल आणि महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचा संताप प्रामुख्याने यावेळी व्यक्त करण्यात आला. या बडग्यावर ‘१५ लाख रुपये अजून लोकांच्या खात्यात जमा झाले नाही. सामान्य माणसाचा संघर्ष आणि रोजीरोटीचा प्रश्न सुटलाच नाही, पण महागाईने दोनवेळचे जेवणही दुरापास्त झाले आहे. मोदी सरकारला त्यांचे आश्वासन पूर्ण न करता आल्याचा संताप जाहीरपणे या बडग्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. जनतेची फसवणूक करून सत्तेत आलेल्यांचा हा बडगा लोकांचा आकर्षणाचा केंद्र होता. विदर्भ क्रांती दल व युवा शक्ती बडग्या उत्सव मंडळातर्फे हा बडग्या काढण्यात आला होता.
कांदा चोर बडग्या
गंजीपेठ गांधी चौक येथील बाल मित्र बडग्या उत्सव मंडळाने काढलेला कांदा चोर बडग्या सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरला. सध्या कांद्याची साठवणूक करणारे खरे भ्रष्टाचारी असून त्यांच्यामुळेच महागाईला प्रोत्साहन मिळत असल्याचे फलक या बडग्यावर लावण्यात आले होते.
दहशतवादी नावेदचा बडग्या
काश्मीरमध्ये पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी नावेद याचा बडग्या भालदारपुरा येथील बाल उत्सव मंडळातर्फे काढण्यात आला. या बडग्याच्या माध्यमातून नावेदला फाशी देण्यात यावी, अशी मागणी करणारा फलक लावण्यात आला होता.
एसएनडीएलचा बडग्या
शहरातील नागरिक एसएनडीएलपासून किती त्रस्त आहेत, याचे मूर्तीमंत उदाहरण या मिरवणुकीत पाहायला मिळाले. एसएनडीएलचा बडग्याने लोकांना आकर्षित केले. ‘अत्याधिक वीज बिल पाठवणारा व महाग वीज विकणारा बडग्या’ या ओळींनी लोकांना आकर्षित केले. नागरिकांकडून बरोबर पैसे वसूल केले जाते परंतु एसएनडीएलतर्फे शासनाकडे कर जमा केला जात नाही, यावरही या बडग्याच्या माध्यमातून प्रहार करण्यात आला.
अपयशी रेल्वे अंडरब्रिज
मेहंदीबाग येथील रेल्वे अंडरब्रिजमुळे येथील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून जो त्रास सहन करावा लागत आहे, त्याकडे शिव मंदिर सार्वजनिक बडग्या उत्सव मंडळाने बडग्याद्वारे लक्ष वेधले. ‘अपयशी अंडरब्रिज’ असे या बडग्याला नाव देण्यात आले होते. मेहंदीबाग येथील अंडरब्रिज हा चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला असल्याने पुलाखालील बारा महिने गुडध्यावर पाणी साचलेले असते. वाहतूक व्यवस्था बिघडवणारा अंडरब्रिज या फलकाने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
बेटी बचाओ, बेटी पढाओ
मासुरकर चौक इतवारी येथील श्री बाल विद्यार्थी बडग्या मंडळातर्फे काढण्यात आलेला सर्वात शेवटच्या बडग्याने लोकांना विशेष आकर्षित केले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा केंद्र सरकारचा नारा आहे, तेव्हा गंगाजमुना येथील वेश्या व्यवसाय हटाओ, बेटी बचाओ, बेटी पढाओ, असे घोषवाक्य या बडग्यावर लिहिले होते.
बेधुंद नृत्याने मिरवणुकीत जोश
गेली अनेक वर्षे या मिरवणुकीत ढोलताशे वाजवून मिरवणूक काढली जायची. पण बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत गेल्या काही वर्षांपासून अत्याधुनिक ध्वनियंत्रणेवर चित्रपटगीते वाजविण्यात येतात आणि त्यावर तरुणाईचे उन्मादक नृत्य सुरू असते. यंदाही अत्याधुनिक डीजेच्या तालावर ‘लुंगी डान्स..., गंदी बात...ऐनाविना डोबशोब मारेया करो...’ आदी नव्या ऱ्हिदमिक गीतांची चलती होती. त्यावर तरुणाचे बेधुंद नृत्य रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांचाही जोश वाढविणारे होते. त्यामुळे नागरिकही जोशात येऊन चौकाचौकात डीजे तालावर ताल धरीत भरउन्हात धम्माल नृत्यात रंगले.
इतना बडा हिंदुस्थान, क्या बिगाडेंगा पाकिस्तान
स्थानिक पातळीवरच्या समस्यांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या समस्याही संपाव्यात म्हणून यंदा मारबत उत्सवात उत्साहाचे वातावरण होते. मारबत उत्सवाच्या मिरवणुकीत पहिलाच बडगा पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफीज सईद याचा होता. पाकिस्तानच्या दोगल्या नीतीवर आणि हाफीज सईदचा निषेध व्यक्त करणारा हा बडगा चांगलाच चर्चेत राहिला. या बडग्यावर ‘इतना बडा हिंदुस्थान, हमारा क्या बिगाडेंगा पाकिस्तान ’ अशा ओळी लिहिल्या होत्या. पाकिस्तानबद्दलचा रोष या बडग्यातून जनतेने व्यक्त केला.