परीक्षा घेणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:07 AM2021-04-12T04:07:13+5:302021-04-12T04:07:13+5:30
नागपूर : कोरोनाने राज्यात भयावय स्थिती निर्माण केली आहे. राज्यात पॉझिटिव्हची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. दररोज हजाराच्या जवळपास ...
नागपूर : कोरोनाने राज्यात भयावय स्थिती निर्माण केली आहे. राज्यात पॉझिटिव्हची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. दररोज हजाराच्या जवळपास मृत्यूचा आकडा आहे. औषधांचा तुटवडा, बेडची अनुपलब्धता, लसीकरणाचा फज्जा ही सर्व परिस्थिती सरकार व प्रशासनासाठी डोईजड झाली आहे. अशात राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन एप्रिल महिन्याच्या २३ आणि २९ पासून केले आहे. परीक्षेच्या आयोजनात लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. ३२ लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यापुढे ठाकलेली परिस्थिती लक्षात घेता परीक्षेचे आयोजन म्हणजे जीव धोक्यात घालणे होय, असा सूर शिक्षण क्षेत्रातून उमटतो आहे. शिक्षकांच्या संघटनांकडून, आमदारांसोबतच शिक्षण तज्ज्ञांकडून बोर्डाकडे निवेदने पाठविली जात आहेत.
सरकारने जसे पहिली ते आठवी आणि नववी व अकराव्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिली, हाच नियम दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबतीत लावण्यात यावा, अशीही मागणी होत आहे. परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. शिक्षकांना प्रशासनाने कोरोनाच्या कामात सहभागी करून घेतले आहे. अनेक शिक्षक पॉझिटिव्हसुद्धा येत आहेत. शिक्षकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे जिवाच्या भीतीने परीक्षेत सहकार्य करण्यास शिक्षक तयार नाहीत. त्याचबरोबर वर्षभर शाळा बंद असल्याने कर्मचारी उपलब्ध नाहीत. स्वयं अर्थसहायित शिक्षकांना घरी बसावे लागले आहे. संक्रमण इतके वाढले आहे की कोण कधी पॉझिटिव्ह निघेल सांगता येत नाही. त्यामुळे परीक्षा स्थगित कराव्यात, अथवा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी होत आहे.
- या परीक्षेसाठी लाखावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. ३० लाखांवर विद्यार्थी राज्यभरात परीक्षा देणार आहेत. सध्या परिस्थिती खूप वाईट आहे. अशात विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टाहास शासनाने सोडायला हवा. परीक्षेचे आयोजन करून जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
नागो गाणार, शिक्षक आमदार
- अशा परिस्थितीत हट्ट करून परीक्षा घेतल्यास परीक्षेदरम्यान काही अघटित प्रकार घडला व सुरू झालेली परीक्षा मध्येच थांबवावी लागली तर ते योग्य होणार नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शैक्षणिक नियोजन आणि वेळापत्रक कोलमडले आहेच. त्यामध्ये सुधारणा करून जून महिन्यात त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षेचे आयोजन करावे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि काही संस्थांनी एप्रिल व मे हे दोन महिने कोरोनाच्या दृष्टीने घातक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे परीक्षा तूर्तास स्थगित करणे हे शहाणपणाचे ठरेल.
पुरुषोत्तम पंचभाई, अध्यक्ष, महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ
- वर्षभरापासून शाळा बंद असल्याने खासगी अंदाजे तीन लाख विनाअनुदानित शिक्षक बेरोजगार झालेले आहेत. त्यांना शासनाने कुठलीही आर्थिक मद्त केलेली नाही. त्यामुळे दहावी व बारावी परीक्षेवर कोरोना संक्रमणाबरोबरच खासगी शाळा व शिक्षक यांच्या आर्थिक अडचणीमुळे ते शाळेत येण्यास तयार नाहीत. कोरोना वेगाने पसरत असल्याने शिक्षणमंत्र्यांनी तातडीने याचा विचार करून परीक्षा पुढे ढकलावी किंवा रद्द करून वर्गोन्नती द्यावी.
प्रा. सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाउंडेशन