प्रतिभा, तंत्रज्ञान, विश्वास देशाच्या विकासाची त्रिसूत्री : डॉ. रघुनाथ माशेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 08:52 PM2020-01-28T20:52:13+5:302020-01-28T20:54:56+5:30

नेहमी आपल्या देशातील प्रतिभा व तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा. त्यातून आपल्याला बळकट राष्ट्र निर्माण करता येईल, असे पद्मविभूषण सन्मानप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांनी सोमवारी ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’ कार्यक्रमात बोलताना सांगितले.

Talent, Technology, Faith Trilogy of Country Development: Dr. Raghunath Mashelkar | प्रतिभा, तंत्रज्ञान, विश्वास देशाच्या विकासाची त्रिसूत्री : डॉ. रघुनाथ माशेलकर

प्रतिभा, तंत्रज्ञान, विश्वास देशाच्या विकासाची त्रिसूत्री : डॉ. रघुनाथ माशेलकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिभा, तंत्रज्ञान व विश्वास या तीन गोष्टी देशाच्या विकासाचा पाया आहेत. नेहमी आपल्या देशातील प्रतिभा व तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा. त्यातून आपल्याला बळकट राष्ट्र निर्माण करता येईल, असे पद्मविभूषण सन्मानप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांनी सोमवारी ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’ कार्यक्रमात बोलताना सांगितले.


डॉ. माशेलकर या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. केमिकल इंजिनियर असलेले डॉ. माशेलकर हे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे माजी महासंचालक आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी व इन्स्टिट्यूशन ऑफ केमिकल इंजिनियर्सचे अध्यक्ष होते. त्यांनी पुढे बोलताना शिक्षण व नवनिर्मितीचे महत्त्वही समजावून सांगितले. देशबांधणीत शिक्षण व नवनिर्मितीदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. शिक्षणामुळे देशाचे भविष्य घडते तर, नवनिर्मितीमुळे प्रगतीचा वेग वाढतो. आपल्याला आणखी झपाट्याने पुढे जाण्यासाठी शिक्षणामध्ये नवनिर्मिती आणणे गरजेचे आहे. आपण नवनिर्मितीमध्ये मागे राहिल्यास इतर देश पुढे निघून जातील, असे ते म्हणाले.
याप्रसंगी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे व लोकमत समाचार नागपूरचे संपादक विकास मिश्रा यांनी डॉ. माशेलकर यांची प्रगट मुलाखत घेतली. त्यातही डॉ. माशेलकर यांनी विविध प्रश्नांना विस्तृत उत्तरे दिली. १९७६ मध्ये महासंचालकपदाची सूत्रे स्वीकारली त्यावेळी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्चची अवस्था चांगली नव्हती. या संस्थेला आंतरबाह्य बदलण्यासाठी अनेक कामे करावी लागली. त्यामुळे ही संस्था राष्ट्रस्तरावर दखलपात्र झाली. नवनिर्मितीत मोडणाऱ्या या कामाचा प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांनी ‘दि सायंटिफिक एज’ पुस्तकामध्ये उल्लेख केला. या संस्थेने जीवनात सर्वकाही दिले. संस्थेच्या माध्यमातून केलेल्या देशसेवेमुळे समाधानी आहे, असे त्यांनी सांगितले.
जीवनात येणाऱ्या संकंटांवर मात करून पुढे जाण्याची प्रत्येकाला प्रेरणा मिळावी व देशाला दिशा देणारे नेतृत्व विकसित व्हावे, या उद्देशाने रवी पंडित यांच्यासोबत मिळून ‘लिप फ्रॉगिंग टू पोल-व्हॉल्टिंग’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या ४५ दिवसांत खपली. त्यानंतर टाटा लिटरेचर लाईव्हने त्या पुस्तकाला २०१९ मधील ‘बिझनेस बुक ऑफ दि इयर’ पुरस्कार प्रदान केला. हे पुस्तक जीवनात हनुमान उडी कशी घ्यायची हे शिकवते, अशी माहिती त्यांनी दिली.
जगामध्ये हजारो चुकीचे पेटंटस् देण्यात आले आहेत. त्यात जखम भरून काढण्यासाठी हळदीचा उपयोग करण्याच्या पद्धतीचा आणि बासमती तांदळाच्या वाणाचा समावेश होता. या दोन्हीचे अमेरिकेला पेटंट देण्यात आले होते. त्याविरुद्ध लढा दिला. त्यामुळे दोन्ही पेटंट मागे घेण्यात आले. जखम भरून काढण्यासाठी हळदीचा उपयोग करणे हे भारताचे पारंपरिक ज्ञान आहे. बासमती तांदळाचा उगम भारतातील आहे, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
दिवंगत माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन व डॉ. माशेलकर या दोघांची सुरुवातीला हलाखीची आर्थिक परिस्थिती होती व ते टाटा ट्रस्टकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकले. कालांतराने नारायणन राष्ट्रपती झाले आणि त्यांच्या हस्ते टाटा समूहाचे रतन टाटा व डॉ. माशेलकर यांना पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. माशेलकर यांनी हे उदाहरण सांगून शिक्षणाची शक्ती सिद्ध केली.

Web Title: Talent, Technology, Faith Trilogy of Country Development: Dr. Raghunath Mashelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.