प्रतिभावान खेळाडूंनी वाढविला नागपूरचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:21 AM2018-06-02T11:21:18+5:302018-06-02T11:21:30+5:30
शहरातील दोन युवा प्रतिभावान खेळाडू आपापल्या खेळात यशोशिखर गाठण्याचे ध्येय बाळगून आहेत. १२ वर्षांचा रौनक साधवानी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर बनला तर १७ वर्षीय मालविकाने आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील दोन युवा प्रतिभावान खेळाडू आपापल्या खेळात यशोशिखर गाठण्याचे ध्येय बाळगून आहेत. १२ वर्षांचा रौनक साधवानी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर बनला तर १७ वर्षीय मालविकाने आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले. दोघांच्याची कामगिरीने आॅरेंज सिटीच्या क्रीडावैभवात भर पडली आहे. दोघांच्याही भरारीची दखल घेत स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरने (एसजेएएन) शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांच्या भावी योजना जाणून घेतल्या.
पत्रकारांशी संवाद साधताना शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली मालविका म्हणाली,‘माझे अंतिम ध्येय बॅडमिंटनच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविणे हेच आहे. यंदाअखेर देशात नंबर वन बनण्याचे उद्दिष्ट आखले असून राष्ट्रीय तसेच राज्य स्पर्धा जिंकायची आहे.’
आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन योगायोगाने नागपुरातच होत असल्याने घरच्या प्रेक्षकांपुढे खेळण्यास मालविका उत्सुक आहे. डावखुरी असलेली मालविका म्हणाली,‘ आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धा मोठी आहे. जेतेपदासाठी मला चायनीज तायपेई, इंडोनेशिया आणि मलेशियाच्या खेळाडूंचे आव्हान मोडून काढावे लागेल. महाराष्ट्रातील सर्वांत कमी वयाचा आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा मान संपादन करणारा रौनक म्हणाला,‘ इतक्या कमी वयात अशी कामगिरी होईल,असा विचारही मनात डोकावला नव्हता. पण आता ग्रॅन्डमास्टर होण्यासाठी मेहनत घेणार. २०१६ मध्ये मी स्पेनमधील स्पर्धेत खेळताना आयएम होण्याचा विचार डोक्यात आला.
ररोज आठ- दहा तास सराव करीत मी आक्रमक चाली खेळतो.’
रौनक हा बुद्धिबळाशिवाय जलतरणात पटाईत आहे. बुद्धिबळामुळे अभ्यासावर परिणाम होतो का, असे विचारताच वयाच्या आठव्या वर्षांपासून बुद्धिबळात आलेला रौनक म्हणाला,‘ अभ्यास मागे पडतो पण त्यासाठी आवडता खेळ सोडणार नाही. माझे वडील आणि विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद हे माझे मार्गदर्शक आहेत. खेळातील बारकावे आणि डावपेच शिकविणारे ग्रॅन्डमास्टर स्वप्निल धापोडे याचेही रौनकने आभार मानले. प्रारंभी एसजेएएन सचिव संदीप दाभेकर आणि कोषाध्यक्ष सुहास नायसे यांनी दोन्ही खेळाडूंचे स्वागत केले. डॉ. राम ठाकूर यांनी संचालन केले. कार्यक्रमाला मालविकाचे कोच किरण माकोडे हे देखील उपस्थित होते.