तालिबानी मतिनचे मेघालय-आसाममध्ये नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:12 AM2021-08-20T04:12:24+5:302021-08-20T04:12:24+5:30

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तब्बल ११ वर्षे नागपुरात वास्तव्य करून पोलिसांच्या नजरेत येताच फरार झालेला ...

Taliban Matin's network in Meghalaya-Assam | तालिबानी मतिनचे मेघालय-आसाममध्ये नेटवर्क

तालिबानी मतिनचे मेघालय-आसाममध्ये नेटवर्क

googlenewsNext

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तब्बल ११ वर्षे नागपुरात वास्तव्य करून पोलिसांच्या नजरेत येताच फरार झालेला तालिबानी समर्थक अब्दुल मतिनने आसाममध्ये नेटवर्क निर्माण केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, मतिनची नागपुरात कोट्यवधींची मालमत्ता सध्या बेवारस अवस्थेत असून येथून पळून गेल्यानंतर त्याने या मालमत्तेला विकण्यासाठी काही दलालांच्या माध्यमातून प्रयत्न चालविल्याची चर्चा आहे.

मूळचा अफगानमधील रहिवासी असलेला आणि गेल्या ११ वर्षांपासून नागपूरच्या दिघोरी भागात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नूर मोहम्मद (वय ३०) नामक आरोपीला विशेष शाखा आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी १६ जूनला अटक केली होती. त्याच्याकडून बनावट कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करण्यात आले होते. नूर मोहम्मदच्या शरीरातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याचे निशाण (व्रण) होते. तो अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करत होता. त्याच्या मोबाइलमध्ये एक हिंसक व्हिडिओसुद्धा मिळाला होता. त्यामुळे तो तालिबानीच असावा असा संशय निर्माण झाला होता. चाैकशीअंती २३ जूनला पोलिसांनी मोहम्मदला दिल्ली-काबूल विमानात बसवून भारतातून हाकलून लावले. विशेष म्हणजे, या घडामोडीच्या दोन महिन्यांनंतर आता तालिबान्यांनी काबूलवर कब्जा करून तेथील सत्तेचा तख्तापलट केला आणि नूर मोहम्मद तालिबानी अतिरेक्यांच्या वेशात मशीनगन घेऊन असल्याचा फोटो व्हायरल झाला. यामुळे तपास यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा फोटो खरा की खोटा, ते तपासण्यासाठी आता तपास यंत्रणा कामी लागली आहे.

त्याहीपेक्षा खळबळजनक बाब अशी की, नूर मोहम्मदला अटक करण्यापूर्वीच त्याच्यासोबत नागपुरात ११ वर्षे वास्तव्याला असलेला मतिन नामक साथीदार येथून फरार झाला. पोलिसांनी त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आणि मतिन हे दोघे अफगानिस्तानातील गावात राहत होते, ते गाव तालिबानी अतिरेक्यांचा गड मानले जाते. या दोघांनी प्रारंभी नागपुरात ब्लँकेट विकले अन् पाहता पाहता मतिनने येथे कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली. अवैध सावकारीही सुरू केली. मतिनविरुद्ध २०१७ मध्ये नंदनवनमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. नूर मोहम्मदला पोलिसांनी पकडल्यानंतर

मतिन आसाम, मेघालयकडे पळून गेला असावा, असा संशय होता. कारण, तो २०१० मध्ये भारतात आला तेव्हा त्याने सर्वप्रथम आसाममध्येच डेरा टाकला होता. पोलिसांनी काही दिवस चाैकशी केल्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात टाकले. मतिनने जमविलेली कोट्यवधींची मालमत्ता तूर्त बेवारस अवस्थेत आहे. काही दलालांनी ती विकण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न केल्याचीही चर्चा होती. अफगाणिस्तानात अराजकता निर्माण झाल्यामुळे आणि नागपुरातून (भारतातून) हाकलून लावलेला नूर मोहम्मद तालिबानीच असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने आता परत मतिनची नव्याने शोधाशोध सुरू झाली आहे. त्याने आसाममध्ये आपले नेटवर्क निर्माण केले असावे, असाही संशय आहे.

----

मतिनचा आम्ही शोध घेत आहोत

तत्कालीन परिस्थितीमुळे नूर मोहम्मदला डिपोर्ट करावे लागले. मात्र, मतिनविरुद्ध गुन्हा दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तो वैध मार्गाने भारत सोडू शकत नाही. आम्ही मतिनचा कसून शोध घेत आहोत, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

----

Web Title: Taliban Matin's network in Meghalaya-Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.