नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या बदलीची चर्चा जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:36 AM2018-01-10T00:36:51+5:302018-01-10T00:40:26+5:30
पोलीस उपायुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुणे किंवा मुंबईत बदली होणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. येथील नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या नावावर गुरुवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : पोलीस उपायुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुणे किंवा मुंबईत बदली होणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. येथील नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या नावावर गुरुवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.
दीड वर्षांपूर्वी नागपुरात आयुक्त म्हणून बदली झालेले डॉ. व्यंकटेशम मितभाषी आणि अभ्यासू अधिकारी म्हणून लवकरच सर्वत्र ओळखीचे झाले. त्यांनी शहर पोलीस दलाचा चेहरामोहरा स्मार्ट करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. शहरात सर्वत्र सीसीटीव्ही, महिला आणि मुलींच्या मदतीसाठी भरोसा सेल, बडी कॉप्स, पोलिसांच्या प्रशिक्षणासाठी एन कॉप्स एक्सीलन्स आणि असेच अनेक उपक्रम सुरू केले. पोलिसांच्या कामगिरीचे स्वत:च आॅडिट करवून घेतले. तंत्रज्ञानाचा वापर करून कमी मनुष्यबळात विधिमंडळ अधिवेशनाच्या बंदोबस्ताचा त्यांचा प्रयोग राज्यभरात प्रशंसेचा विषय ठरला. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या आधारेच नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यावर त्यांनी भर दिला. आकडे बघितले तर नागपुरातील गुन्हेगारी कमी झाल्याचेही दिसते. पोलीस आयुक्त, उपायुक्तांच्या कार्यालयासह शहरातील ३० ही पोलीस ठाण्यांचा चेहरामोहरा बदलविण्यात डॉ. व्यंकटेशम यांची भूमिका मोलाची ठरली. मात्र, अधूनमधून उफाळून येणारी गुन्हेगारी आणि त्यामुळे होणारी टीका बघता त्यांची बदली होणार असल्याचे किंबहुना डॉ. व्यंकटेशम स्वत:च आपली बदली करवून घेणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. आता पुन्हा नव्याने ही चर्चा सुरू झाली आहे.
नागपूरचे आयुक्तपद अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या दर्जाचे आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त तीन अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यातील एक म्हणजे डी. कनकरत्नम यांचे नाव होय. कनकरत्नम यांच्याकडे सध्या नक्षल आॅपरेशनची जबाबदारी आहे. ते नागपूरचे सहपोलीस आयुक्त राहिले आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगारीची माहिती आहे. त्यांच्यासारखेच दुसरे नाव संजीवकुमार यांचे आहे. ते सध्या अतिरिक्त आयुक्त म्हणून सीआयडीला आहेत तर, तिसरे नाव अतिरिक्त महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे आहे. डॉ. उपाध्याय यांनी नागपुरात विविध पदावर प्रदीर्घ कामगिरी बजावली असून, सौजन्यशील मात्र अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.
अपवादात्मक अवस्थेत अन्य अधिकाऱ्याचे नाव पुढे येऊ शकते, असा दावा वरिष्ठ सूत्रांचा आहे. अन्य अधिकाºयांच्या तुलनेत डॉ. उपाध्याय यांनाच नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात येईल,अशीही माहिती आहे.
गुरुवारच्या बैठकीत निर्णय?
सध्या राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. त्याचा समारोप अन् वरिष्ठांच्या बैठकीसंबंधाने गुरुवारी ११ जानेवारीला मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नागपूरच्या नवीन पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते. डॉ. व्यंकटेशम यांची पुण्याला किंवा मुंबईला बदली होणार असल्याचीही वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. यासंबंधाने पोलीस आयुक्तांशी संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.