तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची प्रतिमा स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:01 AM2018-04-19T01:01:47+5:302018-04-19T01:01:59+5:30
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर ‘सेक्स फॉर डिग्री’ प्रकरणात होत असलेल्या आधारहीन व निंदनीय आरोपांचा महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. पुरोहित यांच्या स्वच्छ प्रतिमेला कलंकित करण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात असल्याचे महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी, सरचिटणीस शिरिष बोरकर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर ‘सेक्स फॉर डिग्री’ प्रकरणात होत असलेल्या आधारहीन व निंदनीय आरोपांचा महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. पुरोहित यांच्या स्वच्छ प्रतिमेला कलंकित करण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात असल्याचे महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी, सरचिटणीस शिरिष बोरकर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
नागपुरातील माध्यमे गेल्या अनेक वर्षांपासून पुरोहित यांना सामाजिक तत्त्व सांभाळून जगणारे व सतत जनतेच्या भल्याचा विचार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखतात. सर्वांना अत्यंत आदर असल्यामुळे ते बाबूजी म्हणून सर्वत्र लोकप्रिय आहेत. मध्य भारतातील माध्यम प्रतिनिधींसाठी ते पितृतुल्य आहेत. ते नेहमीच भ्रष्टाचार व अन्यायाविरुद्ध लढत असतात. माध्यम प्रतिनिधींच्या संघर्षात सहभागी होत असतात. ते सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत. ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकाचे व्यवस्थापकीय संपादक हे पद व शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता त्यांनी समाजाकरिता अनेक महत्त्वाची कार्ये केली आहेत. अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वावर होत असलेल्या अवमानकारक आरोपांना कुणीच महत्त्व द्यायला नको. सर्व आरोप निरर्थक आहेत. आरोपांना प्रसिद्धी देणारे केवळ कुप्रवृत्तीचे दर्शन घडवित आहेत. पुरोहित यांच्या नेतृत्वातील सर्व संस्थांमध्ये मोठ्या संख्येत महिला कार्यरत आहेत. त्यांना कधीच कोणताही त्रास झाला नाही. कामाच्या ठिकाणी त्या स्वत:ला सुरक्षित समजतात. अशा परिस्थितीत पुरोहित यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे खेदजनक आहे अशी भूमिका संघाने मांडली आहे.