तामिळनाडूच्या पथकाने ४० डुकरांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:00 AM2019-07-23T01:00:47+5:302019-07-23T01:01:55+5:30
शहरात डुकरांचा वाढलेला हैदोस पाहता मनपा कांजीहाऊस विभागाने तामिळनाडूच्या पथकाची मदत घेतली आहे. या पथकातील २१ सदस्यांनी सोमवारी शहरातील भिवसन खोरी, के.टी. नगर, गिट्टीखदान परिसरातून डुकरांना पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात डुकरांचा वाढलेला हैदोस पाहता मनपा कांजीहाऊस विभागाने तामिळनाडूच्या पथकाची मदत घेतली आहे. या पथकातील २१ सदस्यांनी सोमवारी शहरातील भिवसन खोरी, के.टी. नगर, गिट्टीखदान परिसरातून डुकरांना पकडले. डुकरांना पकडण्याची कारवाई होत असताना स्थानिक नागरिकांनी याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने कडक भूमिका घेत कारवाई केली. या डुकरांना पकडून मनपा मुख्यालयात आणण्यात आले. मनपाचे पशुचिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, डुकरांना पकडण्याची करावाई आणखी तीव्र करण्यात येईल. शहरातील अनेक भागांमध्ये डुक्कर उघड्यावर सर्रास फिरत आहेत. त्यामुळे नागरिकंना त्रास होत आहे. अशा भागातील डुकरांना पकडण्याची विशेष मोहीम राबविण्यात येईल. या डुकरांना पकडून शहराबाहेर वन्यक्षेत्रात सोडले जाईल, जेणेकरून ते शहरात परत येणार नाहीत.