तानाजींनी वाढविला ताण

By admin | Published: May 18, 2017 02:23 AM2017-05-18T02:23:27+5:302017-05-18T02:23:27+5:30

महापालिकेतील काँग्रेसच्या २९ सदस्यांपैकी १७ सदस्यांनी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्यावर अविश्वास व्यक्त करून ....

Tanaji increased the stress | तानाजींनी वाढविला ताण

तानाजींनी वाढविला ताण

Next

महाकाळकर यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील काँग्रेसच्या २९ सदस्यांपैकी १७ सदस्यांनी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्यावर अविश्वास व्यक्त करून गटनेतेपदासाठी तानाजी वनवे यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रावरील स्वाक्षरींची बुधवारी पडताळणी करण्यात आली. यात १६ नगरसेवकांनी वनवे यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे महाकाळकर यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे.
तानाजी वनवे यांनी १७ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याबाबतचे पत्र मंगळवारी विभागीय आयुक्तांना दिले होते. परंतु वनवे यांनी विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनावर आम्ही सह्या केल्या नसल्याचा दावा दिनेश यादव, नेहा निकोसे व परसराम मानवट या तिघांनी केला होता. रात्रभरात चक्र फिरले अन् या तिघांनी आपली भूमिका बदलविली. बुधवारी तिघेही वनवे यांच्या गटात सहभागी झाले.
तर महाकाळकर यांनी वनवे यांनी सादर केलेल्या पत्रातील चार सदस्यांनी सह्या केल्या नसल्याचा दावा केला होता. दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे करण्यात आल्याने विभागीय आयुक्तांनी महापालिकेचे निगम सचिव हरीश दुबे यांना १७ सदस्यांच्या स्वाक्षरींची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नगरपरिषद प्रशासन विभागाचे प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात व्हिडिओ चित्रीकरणात सदस्यांच्या स्वाक्षरींची पडताळणी करण्यात आली. १६ सदस्यांनी वनवे यांना पाठिंबा दर्शविला.
यात प्रफुल्ल गुडधे, संदीप सहारे, जुल्फेकार अहमद भुट्टो, तानाजी वनवे, कमलेश चौधरी, हर्षला साबळे, गार्गी चोपरा, पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, मनोज गावंडे, परसराम मानवटकर, आशा उईके, दिनेश यादव, प्रणिता शहाणे, नेहा राकेश निकोसे व अंसारी सय्यदा बेगम मो. निजामुद्दीन आदींचा समावेश आहे. वनवे यांना १६ सदस्यांनी पाठिंबा दर्शविल्याने महाकाळकर यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. दरम्यान बुधवारी संजय महाकाळकर यांनी विभागीय आयुक्तांना पत्र दिले.
यात नेहा राकेश निकोसे, रमेश पुणेकर, परसराम मानवटकर व दिनेश यादव आदींच्या तानाजी वनवे यांच्या पत्रावरील स्वाक्षऱ्या रद्द समजण्यात याव्या, अशी विनंती केली होती. विशेष म्हणजे यावर या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
४ मार्च २०१७ रोजी नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत महापालिकेतील गटनेता म्हणून संजय महाकाळकर यांची निवड करण्यात आली होती. यात २६ नगरसेवक ांचा पाठिंबा असल्याचे दर्शविण्यात आले. परंतु महाकाळकर यांना १७ नगरसेवकांचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर प्रगती भवनात मंगळवारी नगरसेविका हर्षला साबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात विरोधी पक्षनेतेपदासाठी तानाजी वनवे यांची निवड करण्यात आली. याबाबतच्या ठरावाची प्रत विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनाला जोडण्यात आली आहे. स्वाक्षरी पडताळणीचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आल्याची माहिती निगम सचिव हरीश दुबे यांनी दिली.
महापालिकेतील काँग्रेसच्या बहुसंख्य नगरसेवकांना संजय महाकाळकर यांच्या गटनेतेपदाला विरोध असल्याचे अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणले होते. मंगळवारी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत गटनेतेपदासाठी माझी निवड करण्यात आली. - तानाजी वनवे, नगरसेवक

Web Title: Tanaji increased the stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.