तांदूळवाणी जंगलातील शिकारप्रकरण : तीन शिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 09:19 PM2019-04-02T21:19:22+5:302019-04-02T21:21:50+5:30
वन विभागाच्या कोंढाळी (ता. काटोल) वनपरिक्षत्रांतर्गत मूर्ती बीटमधील तांदूळवाणी जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी फिरत असलेल्या शिकाऱ्यास वन विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गावठी (भरमार) बंदूक, १०९ छर्रे, सहा बंदुकीच्या गोळ्यांच्या कॅप व बिबट्याची कातडी जप्त केली. ही कारवाई सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कोंढाळी) : वन विभागाच्या कोंढाळी (ता. काटोल) वनपरिक्षत्रांतर्गत मूर्ती बीटमधील तांदूळवाणी जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी फिरत असलेल्या शिकाऱ्यास वन विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गावठी (भरमार) बंदूक, १०९ छर्रे, सहा बंदुकीच्या गोळ्यांच्या कॅप व बिबट्याची कातडी जप्त केली. ही कारवाई सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मुकुंदा पुंजाराम नेहारे, अजय मधुकर सोमकुवर (३२) व संजय भीमराव भलावी (३२) तिघेही रा. तांदूळवाणी, ता. काटोल अशी अटक करण्यात आलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत. तांदूळवाणी गावाजवळ १ जानेवारी २०१९ रोजी दोन वर्षीय मृत बिबट आढळून आला होता. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध शिकारीचा गुन्हा नोंदवून जिल्हा वन संरक्षक शंभुनाथ शुक्ला व उपवन संरक्षक संदीप शिरसागर यांच्या मार्गदर्शनात कोंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी यांनी तपासाला सुरुवात केली.
बिबट्याच्या शिकारीत मुकुंदा सहभागी असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. मात्र, त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे अधिकाऱ्यांना मिळत नसल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणे शक्य होत नव्हते. त्यातच मुकुंदा हा सोमवारी (दि. १) रात्री जंगलात फिरत असल्याची माहिती फरीद आझमी यांना मिळाली. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी त्याचा जंगलात शोध घेतला. तो अहमदनगर उपवनाच्या मूर्ती बीटमध्ये आढळून येताच कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत कसून विचारपूर केली.
त्याने १ जानेवारी रोजी बिबट्याची शिकार केल्याचे कबूल केले. शिवाय, त्याच्या साथिदारांची नावेही सांगितली. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. २) सकाळी अजय व संजय या दोघांनाही अटक केली. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी, वनक्षेत्र अधिकारी सुनील मोहोड, वनरक्षक दिवाकर लोखंडे, अजय काठमोडे यांच्या पथकाने केली.
चार दिवसांची वन कोठडी
आरोपींची गुन्ह्याची कबुली देताच त्यांच्याकडून बिबट्याची कातडी, गावठी (भरमार) बंदूक, १०९ छर्रे, सहा बंदुकीच्या गोळ्यांच्या कॅप जप्त करण्यात आल्या. त्यांना मंगळवारी काटोल येथील प्रथम रेणी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिघांनाही चार दिवसांची अर्थात शुक्रवारपर्यंत (दि. ५) वन कोठडी सुनावली. त्यांच्याकडून शिकारीच्या काही घटना उघड होण्याची शक्यत वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
‘थर्टी फर्स्ट पार्टी’ने केला घात
नोव्हेंबर २०१८ मध्ये तांदूळवाणीच्या जंगलात दोन बिबट मृतावस्थेत आढहून आले होते. या तिन्ही आरोपींनी अन्य दोघांच्या मदतीने ‘त्या’ बिबट्यांची कातडी सोलून काढली होती. ती अजयच्या शेतात असलेल्या गोठ्यात लपवून ठेवली होती. ३१ डिसेंबर २०१८ च्या रात्री या तिघांनी शेतात ‘थर्टी फर्स्ट पार्टी’ केली. त्यावेळी गोठ्याचे दार चुकून उघडे राहिले आणि कुत्र्याने आत शिरकाव केला. त्या कुत्र्याने बिबट्याची कातडी बाहेर आणली. अंधारात ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली. या तिघांनी ‘त्या’ बिबट्यांची शिकार केली असावी, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.