नागपुरात चिमुकल्यांच्या उत्साहात रंगला तान्हा पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:24 PM2018-09-10T23:24:24+5:302018-09-10T23:26:45+5:30

डीजेच्या तालावर शंकराची गाणी, आंब्याची पाने आणि फुग्यांचे तोरण, रंगरंगोटी करून सजविलेले लाकडी बैल, अर्ध्या फुटापासून ते पाच फुटापर्यंतचे डौलदार आकर्षक बैल, यात कुणी बैलासह लावलेला सामाजिक संदेश, सजलेले बैल अन् नटलेले चिमुकले, खाऊची धम्माल, बोजाऱ्याचे समाधान आणि मुलांनी केलेली देवी देवतांपासून महापुरुषांची वेशभूषा...सर्वांचेच कौतुक, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात अनेक ठिकाणी तान्हा पोळा साजरा करण्यात आला.

Tanha Pola become colourful with the enthusiasm of the children in Nagpur | नागपुरात चिमुकल्यांच्या उत्साहात रंगला तान्हा पोळा

नागपुरात चिमुकल्यांच्या उत्साहात रंगला तान्हा पोळा

googlenewsNext
ठळक मुद्देविविध वेशभूषा ठरले आकर्षण : पर्यावरण, अंधश्रद्धा, बेटी बचाओ, महागाई, स्त्री अत्याचारावर दिले संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :

नवीन सुभेदार ले-आऊट
बालगोपालांचा उत्साहाचा सण असलेला तान्हा पोळा नवीन सुभेदार लेआऊट येथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रदेश काँग्रेस समितीचे माजी महासचिव माजी नगरसेवक दीपक कापसे यांच्यातर्फे अमर शहीद विजयभाऊ कापसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण नागपुरात या पोळ्याची ख्याती असून, जवळपास दोन हजार बालगोपालांनी बैलांना आकर्षक सजावट करून, पोळ्यात आणले होते. या उत्सवाचे हे २५वे वर्ष होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व आभाताई चतुर्वेदी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सक्करदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिपान पवार, हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान माने आदी उपस्थित होते. आयोजकांकडून आकर्षक नंदी सजावट पुरस्कार व वेशभूषा पुरस्कारने प्रत्येकी पाच जणांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सायकल देऊन पुरस्कृत करण्यात आले. मुलांनी आकर्षक बैल सजावटीच्या माध्यमातून पर्यावरण, अंधश्रद्धा, शेतकरी आत्महत्या, महागाई, स्त्री अत्याचार या सामाजिक विषयावर संदेश दिले. नगरसेवक दीपक कापसे यांच्या नेतृत्वात हा पोळा साजरा करण्यात आला. यावेळी फटका शो, ढोल पथकाने लक्ष वेधून घेतले होते.

सहा फुटाचा उंच नंदी 
न्यू सुभेदार ले-आऊटमधील तान्हा पोळामध्ये प्रार्थना व युवराज अनुराग रोटकर यांचा सहा फुट उंच व आठ फुट रुंद ५०० किलो वजनाचा नंदी सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरला. या नंदीला पाहण्यासाठी परिसरातील बालगोपालांची गर्दी झाली होती. या नंदीसोबत प्रार्थना व युवराजने गणेश आणि शंकराची वेशभूषा केली होती.
-ईश्वराची खरी सेवा मनुष्य, प्राणी, झाडे जगवा()
ईश्वराची खरी सेवा मनुष्य, प्राणी, झाडे जगवा, हा संदेश देत नवीन सुभेदार येथील तान्हा पोळ्यात सहभागी झालेली सान्वी पाटील हिने केलेली विष्णूची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

बेटी बचाओ, बेटी बढाओ 
बेटी बचाओ, बेटी बढाओ हा संदेश घेऊन अजय जिभकाटे आपल्या नंदीसह तान्ह्या पोळ्यात सहभागी झाला होता. त्याने आपल्या फलकामध्ये मदर तेरेसा ते कल्पना चावला यांचे छायाचित्र चिटकविले होते. ‘अनदेखी बिटियां करे पुकार, मत करो यह अत्याचार’ ही घोषणाही तो देत होता.

पेट्रोल, डिझेलच्या वाढीव दराकडे वेधले लक्ष
गोपाल मानेकर या विद्यार्थ्याने पेट्रोल, डिझेलच्या वाढीव दरावर जाहीर निषेध व्यक्त करीत उत्सवात सहभागी झाला होता. त्याने पेट्रोल भरणाºया मशीनचे कटआऊट आणले होते.

जुळ्या बहिणींनी वेधले लक्ष
अनघा व आरोही डाफरे या जुळ्या बहिणींनी लक्ष वेधत ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’चा संदेश दिला.
-‘मल्हार’ सोबत काढल्या अनेकांनी सेल्फी
सिहांसनावर बसलेली मुद्रा, हातात तलवार तर दुसºया हाताने मिशीला ताव देणारा वेदांत काळे याने ‘मल्हार’ देवाची भूमिका साकारली. ‘क्यूट’ दिसणारा वेदांत याच्यासोबत सेल्फी काढणाºयांनी गर्दी केली होती.

राजाबाक्षा नागरिक
राजाबाक्षा नागरिक सेवा समिती व जय दुर्गा उत्सव मंडळ यांच्यावतीने तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीच्या ज्येष्ठ मंडळींनी शंकराची गाणी गायिली. आलेल्या चिमुकल्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. नगरसेविका लता काडगाये यांनी नंदीची पूजा करून चॉकलेट दिले. उत्सवाच्या आयोजनासाठी सुनील काडगाये, मुकेश खराबे, संजय खराबे, दिनेश वानखेडे, विष्णू भुते आदींनी सहकार्य केले.

अयोध्यानगर 
सरला श्रीगिरीवार यांनी सुरू केलेल्या तान्हा पोळा उत्सवाचे हे २३ वे वर्ष होते. या पोळ्यात मोठ्या संख्येत बाळ-गोपाळ आपल्या सजवलेल्या नंदीसह सहभागी झाले होते. कार्यक्रमाला डॉ. मनीष श्रीगिरीवार, विवेक भुसारी, पांडुरंग वाघ, राजेंद्र ठाकूर, श्रीकांत खोपडे, विशाल येलचटवार आदी उपस्थित होते. यावेळी गौरी या मुलीने सहभागी सर्वांना केक खाऊ घातला.

त्रिपुरा पौर्णिमा उत्सव, जादुमहाल रोड
जादुमहाल रोड येथील त्रिपुरा पौर्णिमा उत्सवाच्यावतीने तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आकर्षक वेशभूषा करणाºया चिमुकल्यांना रमेश लोखंडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी नयन बांते या चिमुकल्याने आदिवासीची भूमिका साकारत ‘सेव्ह वॉटर, सेव्ह ट्री’चा संदेश दिला.

चंद्रमणीनगर नासुप्र उद्यान
चंद्रमणीनगर नागपूर सुधार प्रन्यास उद्यानाच्यावतीने आयोजित तान्हा पोळा बीएसपीचे नागोराव जयकर, सर्वधर्म समाज पार्टीचे भगवान कांबळे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ हा संदेश देणाºया चिमुकलीला गौरविण्यात आले.

युवारंग प्रतिष्ठान, रेशीमबाग
रेशीमबाग येथील युवारंग प्रतिष्ठान व बिहारीलाल चव्हाण बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित तान्हा पोळा उत्सव हितेंद्र चव्हाण, डॉ. राजू त्रिवेदी, प्रशांत कामडी, डॉ. श्रीरंग वºहाडपांडे, गौरव शाहाकार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सहभागी मुला-मुलींनी विविध सामाजिक संदेश दिले.
स्वराज प्रतिष्ठान, रमणा मारोती
ईश्वरनगर शिव मंदिर रमणा मारोती रोड येथील स्वराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित तान्हा पोळा उत्सवात नगरसेवक पिंटु झलके, रेखा साकोरे, मंगला गौरे, राजू नागुलवार सहाभगी झाले होते. उत्सवाचे आयोजन अनुराग राघोर्ते, हर्षल धर्माळे, वैभव सुपारे, सुनील अगडे यांनी केले होते. या उत्सवात ४००वर बाल-गोपाळ सहभागी झाले होते.
-राजे रघुजीनगर
राजे रघुजीनगर येथील गीता कृष्ण चिल्ड्रन्स वर्ल्ड प्ले स्कूलच्यावतीने आयोजित तान्हा पोळा उत्सव लोकेश रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर सतीश होले, माधुरी पालीवार, पूजा मानमोडे, संजय रसाळ, विनायकराव झाडे, राजू मुजर, चंद्रकांत मोहिते आदी उपस्थित होते.
सुर्वे ले-आऊट
अयोध्यानगरनगर रघुजीनगर सिमेंट रोडवरील कृष्ण मंदिर सुर्वे ले-आऊट, येथे तान्हा पोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पोळ्यात नंदी सजावटीसाठी आकर्षक बक्षीस असल्याने, मोठे व आकर्षक सजावट केलेले नंदी येथे बघायला मिळाले. शिवाय फॅन्सी ड्रेस स्पर्धेचेही आयोजन करण्यात आल्याने, मुलांनी आकर्षक वेशभूषा करून पोळ्यात हजेरी लावली होती. नंदी सजावट स्पर्धेत पहिल्या रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत पहिल्या पाच मुलांना रोख पुरस्कार देण्यात आला. 

 

Web Title: Tanha Pola become colourful with the enthusiasm of the children in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.