तान्हुल्याच्या दुधासाठी रेल्वे थांबली !
By admin | Published: May 18, 2016 03:01 AM2016-05-18T03:01:07+5:302016-05-18T03:01:07+5:30
दूध नसल्यामुळे भुकेने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधील एक तान्हुला व्याकुळ झाला. तो भुकेने तडफडत असल्याचे पाहून त्याच्या मातेलाही अश्रू अनावर झाले.
आरपीएफ हेल्पलाईनची मदत : बल्लारशाला थांबविली स्वर्णजयंती एक्स्प्रेस
नागपूर : दूध नसल्यामुळे भुकेने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधील एक तान्हुला व्याकुळ झाला. तो भुकेने तडफडत असल्याचे पाहून त्याच्या मातेलाही अश्रू अनावर झाले. तिच्यासोबत दूध नसल्यामुळे आता काय करावे, असा यक्षप्रश्न उभा झाला. तेवढ्यात तिने रेल्वेगाडीत हेल्पलाईन क्रमांक पाहिला अन् मदतीसाठी आरपीएफच्या हेल्पलाईनला दूरध्वनी केला. तिच्या फोनची त्वरित दखल घेऊन बल्लारशा रेल्वेस्थानकावर गाडी थांबवून त्या तान्हुल्याला आरपीएफने दूध उपलब्ध करुन दिले.
सोमवारी रात्री नवी दिल्ली येथील रहिवासी कुलदिप पुगलिया हे आपली पत्नी एस. सुजाता आणि आपल्या सहा महिन्याच्या तान्हुल्यासह रेल्वेगाडी क्रमांक १२४०४ स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या कोच एस-४, बर्थ ३९ वरून प्रवास करीत होते. बल्लारशा रेल्वेस्थानक येण्यापूर्वी सहा महिन्याचा तान्हुला आपल्या मातेच्या कुशीत भुकेने तडफडत होता. याची जाणीव त्याच्या मातेला झाली. परंतु जवळ दूध शिल्लक नसल्यामुळे तिची चिंता आणखीनच वाढली. पुढील रेल्वेस्थानकावर दूध मिळेल की नाही, या विचाराने ती आणखीनच बेचैन झाली. तेवढ्यात तिची नजर कोचमध्ये लावलेल्या आरपीएफच्या हेल्पलाईन क्रमांकाच्या स्टिकरवर पडली. तिने त्वरित हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून आरपीएफच्या कंट्रोल रुमला आपल्या तान्हुल्याची अवस्था सांगून दूध उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. तिच्या दूरध्वनीनंतर आरपीएफची चमू कामाला लागली. रेल्वेगाडीचे पुढील स्टेशन बल्लारशा होते. आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार बल्लारशा स्थानकावर दूध उपलब्ध नव्हते. आरपीएफच्या जवानांनी बाहेरून दूध आणले आणि गाडी येण्यापूर्वी ते बल्लारशा स्थानकावर हजर झाले. गाडी येताच त्यांनी या महिलेच्या कोचकडे धाव घेतली. आरपीएफचे जवान दूध घेऊन येत असल्याचे पाहताच मातेच्या चेहऱ्यावरील चिंता चुटकीसरशी नाहिशी झाली. तिने भावूक होऊन रेल्वे सुरक्षा दल आणि नागपूर कंट्रोल रुमचे आभार व्यक्त केले.