तान्ह्या पोळ्याला यंदा २०९ वर्षे पूर्ण
By admin | Published: September 13, 2015 02:45 AM2015-09-13T02:45:34+5:302015-09-13T02:45:34+5:30
भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा हा बैलांचा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी लाकडी बैलांचा पोळा लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येतो.
सर्वात मोठा लाकडी बैल : राजे रघुजी भोसले यांनी सुरू केली परंपरा
नागपूर : भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा हा बैलांचा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी लाकडी बैलांचा पोळा लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येतो. हा तान्हा पोळा विदर्भ वगळता कुठेही साजरा करण्यात येत नाही. १८०६ साली श्रीमंत राजे रघुजीराव भोसले (द्वितीय) यांनी लाकडी बैलांचा हा उत्सव सुरू केला. लहान मुलांना बैलांचे महत्त्व कळावे म्हणून ही परंपरा त्यांनी सुरू केली. या परंपरेला यंदा २०९ वर्षे पूर्ण झाले आहेत.
राजे रघुजीराव भोसले यांनी लाकडी बैल तयार करुन मागविले आणि सर्व लहान मुलांना ते वितरित केले. या बैलांना जिवंत बैलांप्रमाणे सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून तला जिलेबी, फळे, चॉकलेट, बिस्कीट बांधण्यात आले. लाकडी बैलांची पूजा करुन पूजा संपल्यावर तोरण तोडून खाऊ खायचा आणि हनुमान खिडकी मार्गे हनुमानाचे दर्शन घेऊन मुलांना खाऊ द्यायचा.
अशी ही प्रथा होती. तेव्हापासून विदर्भात ही प्रथा पाळण्यात येत आहे. हल्लीचे राजे मुधोजीराव भोसले यांनीही ही प्रथा आजतागायत कायम ठेवली आहे. राजे मुधोजीराव भोसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. मुधोजीराजांचे निवासस्थान सिनीयर भोसला पॅलेस, महाल येथे आजही हा बैल ठेवण्यात आला आहे. या बैलाची उंची आठ फूट तर लांबी सहा फूट आहे. बैलाच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. ज्या पद्धतीने रघुजी महाराज बैलाची वाजतगाजत मिरवणूक काढायचे त्याच पद्धतीने आजही मिरवणूक काढली जाते.
ही मिरवणूक १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सिनियर भोसला पॅलेस येथून काढण्यात येणार आहे. काही मंडळात वाड्यातील बैल गेल्याशिवाय पोळा साजरा करण्यात येत नाही. (प्रतिनिधी)