नागपूर ग्रामीण भागातील टँकर जीपीएसने कनेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 09:52 PM2019-05-25T21:52:57+5:302019-05-25T22:02:43+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत्यारीत कंट्रोलरुम तयार करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत्यारीत कंट्रोलरुम तयार करण्यात आली आहे.
त्यामुळे खासगी टँकरमालकांना पाण्याची चोरी अथवा अतिरिक्त फेऱ्या शासन दप्तरी दाखविता येणार नाही़ यामध्ये कामठी तालुक्यात ९, हिंगणा १२ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यामध्ये २८ टँकर गावकऱ्यांची तहान भागवित आहे़ या सर्व टँकरवर जीपीएस सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली़ प्रत्येक पंचायत समितीच्या बीडीओंकडे या टँकरच्या हालचालींची नोंद जीपीएस सिस्टीमच्या माध्यमातून उपलब्ध आहे़ विशेष कक्षही पंचायत समितीस्तरावर उभारण्यात आला़ पाण्याचे टँकर मागणीस्थळी पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती होती़ तशा आशयाच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त होत्या़ त्यावर गंभीर पाऊल म्हणून टँकरला जीपीएस सिस्टीमने जोडण्यात आले़ त्यामुळे आता बनावट फेऱ्या दाखवून बिले काढण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे.
जिल्ह्यात १४८ टँकरची मागणी
हिंगणा, कामठी आणि नागपूर या अर्बन पेरियर गावांमध्ये टँकरच्या फेऱ्या सुरू आहे़ जिल्ह्यात १४८ टँकरची मागणी आहे़ परंतु आतापर्यंत ३५ गावांत ४८ टँकर धावताहेत़ हिंगणा तालुक्यातील सीताखैरी, नीलडोह, कवडस, डीगडोह, तांडा, डेगमा आदी भागात दीड महिन्यापासून टँकर सुरू आहे़ जलसंधारणाची कामे प्रामाणिकपणे न झाल्यास ही संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.