जेईई मेन्समध्ये निकुंज वसयानी शहरात टाॅपर; प्रनिश दुसरा, साेहम तिसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2023 10:43 PM2023-02-07T22:43:07+5:302023-02-07T22:43:39+5:30
Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (एनटीए)ने मंगळवारी जेईई मेन्सच्या प्रथम सत्राचे निकाल जाहीर केले. यामध्ये निकुंज वसयानी या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुण प्राप्त करीत शहरात टॉप केले आहे.
नागपूर : नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (एनटीए)ने मंगळवारी जेईई मेन्सच्या प्रथम सत्राचे निकाल जाहीर केले. यामध्ये निकुंज वसयानी या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के गुण प्राप्त करीत शहरात टॉप केले आहे. याशिवाय प्रनिश पनपालिया या विद्यार्थ्याने ९९.९६८० टक्के आणि साेहम बनाेदे या विद्यार्थ्याने ९९.९६३१ टक्के गुण प्राप्त केले. हे विद्यार्थी शक्यताे द्वितीय व तृतीय टाॅपर ठरले.
एनटीएकडून जानेवारी महिन्यात जेईई मेन्सच्या प्रथम सत्राची परीक्षा घेण्यात आली. यामध्ये नागपूर विभागातून २३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले हाेते. यातील अनेक विद्यार्थ्यांनी ९९ ते ९८ टक्के गुण प्राप्त केले आहेत. याशिवाय ९० टक्क्यांपासून ९५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्यांचीही संख्या माेठी आहे. जेईई तज्ज्ञ आशुताेष हिसारिया यांच्या मते ही परीक्षा जेईई मेन्सचा पहिला टप्पा आहे. जेईई ॲडव्हान्स परीक्षा कठीण टप्पा असताे. बरेच विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेचा पॅटर्न समजण्यासाठी सहभागी झाले हाेते. सध्या विद्यार्थ्यांचे लक्ष या महिन्याच्या शेवटी सुरू हाेणाऱ्या बाेर्डाच्या परीक्षांवरती आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांची टक्केवारी पाहता मागील परीक्षेपेक्षा हे चांगले प्रदर्शन म्हणावे लागेल. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील ६ प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला हाेता. मात्र एनटीएने केवळ तीन आक्षेप स्वीकारले हाेते. सर्व सहाही आक्षेप स्वीकारले गेले असले तर निश्चितच नागपूरच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी १०० वर पाेहोचली असती.
दुसऱ्या सत्राची नाेंदणी सुरू
जेईई मेन्सच्या ॲडव्हान्स सत्राची प्रक्रिया ७ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ही दुसऱ्या सत्राची परीक्षा ६ एप्रिलपासून सुरू हाेईल आणि १२ एप्रिलपर्यंत चालेल.
नियमित अभ्यासाने मिळाले यश
सिटी टाॅपर ठरलेल्या निकुंजने सांगितले, दरराेज १० तास अभ्यासाचे वेळापत्रक ठरविले हाेते व त्यानुसार अभ्यास केला. माेबाइलपासून स्वत:ला दूरच ठेवले. लक्ष विचलित झाले किंवा थकवा वाटला तेव्हा वडिलांसाेबत बुद्धिबळाचा खेळ खेळायचाे. यामुळे एकाग्रता वाढविण्यास मदत झाल्याचे ताे म्हणाला. आता ताे जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या तयारीला लागला आहे. सर्वाेत्तम आयआयटी संस्था मिळावी, हेच लक्ष्य असल्याचे तो म्हणाला.
- निकुंज वसयानी
ॲडव्हान्स परीक्षेसाठी सज्ज
मी लक्ष्य निर्धारित करूनच अभ्यास केला. माेबाइलचा उपयाेग अभ्यास आणि परीक्षेच्या तयारीसाठीच केला व साेशल मीडियापासून स्वत:ला दूरच ठेवले. दरराेज ६ ते ७ तास अभ्यासाचे वेळापत्रक ठरविले हाेते. नियमित अभ्यासानेच यश प्राप्त झाले आहे. मात्र खरे आव्हान जेईई ॲडव्हान्सचे आहे, पण त्यात यश मिळेल, असा विश्वास आहे.
- प्रनिश पनपालिया
यशाचा विश्वास हाेता
चांगले गुण प्राप्त करण्याचा आधीच विचार केला हाेता. त्यानुसार नियमित अभ्यासावरच लक्ष केंद्रित केले. त्यामुळे यश मिळेल, असा विश्वास हाेता. आता जेईई ॲडव्हान्समध्येही सर्वाेत्तम गुण प्राप्त करण्याचे लक्ष्य आहे. या परीक्षेत चांगले गुण प्राप्त करून मनानुसार आवडीच्या आयआयटी संस्थेत प्रवेश मिळणे साेपे हाेईल.
- सोहम बनोदे