जलसंवर्धनासाठी ७३ लाख निसर्गरक्षक तयार करण्याचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:02 AM2021-03-17T11:02:36+5:302021-03-17T11:03:57+5:30
Nagpur News देशातील कोणतेच तलाव, नदी किंवा भूजलही प्रदूषणमुक्त नाही, हेच दिसून येते. नद्या, तलाव, विहिरींचे जल प्रदूषण रोखण्यासाठी एक ‘निसर्ग रक्षक’ आर्मी तयार करण्याचे लक्ष्य एका संस्थेने स्वीकारले आहे. ‘
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशातील ७० टक्के जमिनीवरील पाणी वापर करण्यायोग्य नाही. देशात दररोज ४० लक्ष लिटर सांडपाणी जलस्रोत असलेल्या नद्या, तलावात मिसळते. त्यातील फार थोड्या दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जाते. यावरून देशातील कोणतेच तलाव, नदी किंवा भूजलही प्रदूषणमुक्त नाही, हेच दिसून येते. नद्या, तलाव, विहिरींचे जल प्रदूषण रोखण्यासाठी एक ‘निसर्ग रक्षक’ आर्मी तयार करण्याचे लक्ष्य एका संस्थेने स्वीकारले आहे. ‘अलायन्स फॉर रिव्हर्स इन इंडिया’ असे या संस्थेचे नाव असून या संस्थेने देशात ७३ लक्ष निसर्गरक्षक तयार करण्याचे ध्येय निर्धारित केले आहे. हे निसर्गरक्षक जल प्रदूषणासह जंगल व पर्वतांवर होणारे प्रदूषणही रोखण्यासाठी काम करणार आहेत.
संस्थेचे संयाेजक संजय गुप्ता यांनी या विशाल उपक्रमाबाबत लाेकमतशी बाेलताना माहिती दिली. १२ जुलैपासून इंदाेर येथून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. खरेतर हे भारतातील जनतेचे व विशेषत: तरुणांचे अलायन्स असणार आहे. सध्या काेराेनाची परिस्थिती बघता ऑनलाइन संवाद साधला जात आहे आणि अशाप्रकारे ५०० च्या जवळपास निसर्गरक्षक तयार झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते हे अभियान अमर्याद असणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात १०० अशाप्रकारे ७३ हजार काे-फाऊंडर तयार केले जातील. त्यानंतर तालुकानिहाय १०० अशाप्रकारे ६ लाख आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात १० हजार याप्रमाणे ७३ लाख निसर्गरक्षक तयार हाेतील. एक काे-फाऊंडर त्याच्या क्षेत्रात १०० तरुणांची आर्मी तयार करेल व ही आर्मी त्या भागातील जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करेल. या प्रत्येक निसर्गरक्षकाला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.
- यातून राेजगाराचे लक्ष्यही साध्य हाेईल
पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या स्वयंस्फूर्त तरुणांना या अलायन्समध्ये स्थान मिळेल. ही केवळ समाजसेवा राहणार नाही तर यातून त्यांना राेजगारही मिळेल, असा दावा संजय गुप्ता यांनी केला आहे. राेजगार, स्वयंराेजगार, नवनिर्मिती व उद्याेग अशी या अभियानाची चतु:सूत्री असेल. पर्यावरणपूरक वस्तूंच्या निर्मितीतून उद्याेग स्थापणे, वितरणातून राेजगार व स्वयंराेजगारही केला जाऊ शकता येइल. हे निसर्गरक्षक फुलटाइल, पार्ट टाइम व साेशल करिअरही करू शकतील. याचे रितसर ट्रेनिंग मिळेल. हे निसर्गरक्षक जलसंवर्धनाचा प्रत्येक उपक्रम समाजापर्यंत पाेहचवतील. वस्ती, काॅलनी, समाज, पंचायत, नगरपालिका, महापालिका आणि प्रत्येक सरकार या अलायन्समध्ये सहभागी हाेइल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नद्या, तलाव, झरे किती आहेत
एका माहितीनुसार आपल्या देशात अंदाजे ५० लक्ष झरे आहेत पण हे अंदाजानुसारच. कुठलीच यंत्रणा आपल्या देशात किती नद्या, तलाव किंवा झरे आहेत आणि किती नष्ट झाले, याची माहिती स्पष्टपणे सांगत नाही. ही माहिती संकलित करणे गरजेचे आहे. संबंधित जलस्रोतांची जबाबदारी काेणत्या विभागाकडे आहे, त्या विभागाचा मुख्य अधिकारी काेण, याची इतंभूत माहिती येथे दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रदूषण हाेत असल्यास त्यांना त्याबाबत माहिती देता येइल. आपल्या भागातील विहिरीबाबत, बाेअरवेलबाबतही असे करता येइल.