आयएसआयने बनविले नागपूरला टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:30 PM2018-11-10T12:30:09+5:302018-11-10T12:31:44+5:30

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला टार्गेट बनविले आहे. आयएसआयने वेगवेगळ्या माध्यमातून नागपुरात मोठ्या प्रमाणात आपले एजंट पेरले आहेत.

Target for Nagpur by ISI | आयएसआयने बनविले नागपूरला टार्गेट

आयएसआयने बनविले नागपूरला टार्गेट

Next
ठळक मुद्देअनेक एजंट पेरले महिनाभरात दोनदा कारवाई राज्यातील तपास यंत्रणांमध्ये खळबळ

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला टार्गेट बनविले आहे. आयएसआयने वेगवेगळ्या माध्यमातून नागपुरात मोठ्या प्रमाणात आपले एजंट पेरले आहे. मिलिटरी इंटेलिजन्स एजन्सीने दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने केवळ ३० दिवसात दोन वेळा नागपुरात छापे मारले. केवळ छापेच मारले नाही तर येथे दोन्ही वेळेला आयएसआयचे एजंट पकडले. या कारवाईमुळे राज्यातील तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
७ आॅक्टोबरच्या रात्री नागपुरात आलेल्या मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय) आणि उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) ब्रह्मोस मिसाईलचा डाटा देण्याच्या आरोपाखाली निशांत अग्रवालच्या मुसक्या बांधल्या होत्या. नागपुरात आयएसआयचा एजंट पकडल्याचे वृत्त ८ आॅक्टोबरच्या सकाळी व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर तब्बल दोन दिवस एमआय आणि एटीएसने नागपुरात विविध ठिकाणी तपास केला होता. या घटनेमुळे राज्यातील तपास यंत्रणा खजिल झाली होती. संघ मुख्यालय, दीक्षाभूमीसारखी अत्यंत संवेदनशील स्थळे असलेल्या आणि देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात अनेक वर्षांपासून आयएसआयचा एजंट मिसाईलच्या प्रकल्पात कार्यरत असतो. तो येथून थेट पाकिस्तान तसेच अमेरिकेला माहिती पुरवितो अन् राज्यातील एटीएस किंवा कोणत्याच गुप्तचर संस्थेला कारवाई होईस्तोवर थांगपत्ता लागत नाही, ही बाब गुप्तचर यंत्रणेला खजिल करणारी ठरली होती. अग्रवाल प्रकरणाचे वृत्त ताजेच असताना गुरुवारी ८ नोव्हेंबरच्या रात्री पुन्हा मिलिटरी एजन्सी आणि मुंबईतील तपास पथकाने नागपूर गाठले. त्यांनी येथील पोलीस आयुक्तांना फक्त कारवाईची पुसटशी माहिती दिली आणि आज शुक्रवारी दुपारी भालदारपुऱ्यात छापा घालून एकाला तर काही वेळेनंतर दुसºयाला पकडले. हे दोघेही आयएसआयचे एजंट असल्याची माहिती खास सूत्रांनी लोकमतला दिली आहे. अवघ्या एक महिन्यात तीन आयएसआयचे एजंट नागपुरात पकडण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणाही हादरल्या आहेत. पाकिस्तानात मुख्यालय असलेल्या आयएसआयने नागपूरला टार्गेट केल्याचे या कारवाईतून थेट संकेत मिळाले आहे. नागपुरात आयएसआय एजंट बिनबोभाट वावरत असताना सुरक्षा यंत्रणा, तपास यंत्रणांना त्याचा थांगपत्ता लागू नये, ही बाब वरिष्ठ पातळीवर चर्चेला आली असून, त्या संबंधाने गृहखाते तसेच पोलीस महासंचालनालयातही आज रात्री उशिरापर्यंत गंभीर मंथन सुरू होते, अशी सूत्रांची माहिती आहे. नागपुरात आणखी किती एजंट दडले आहेत आणि त्यांनी कोणता कट रचला आहे, त्याबाबत तसेच पुढे कारवाईसाठी काय व्यूहरचना करायची, त्यावरही गंभीर चर्चा सुरू असल्याचे समजते.

पोलिसांसह, एटीएसलाही दूरच ठेवले
ही कारवाई करण्यापूर्वी इंटेलिजन्स एजन्सीच्या अधिकाºयांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आल्याची नोंद केली. मात्र, त्यांना कारवाई कुठे करणार, याबाबत कसलीही कल्पना देण्यात आली नाही. पोलीस पथकाला कारवाईच्या स्थळापासून एक फर्लांग अंतरावर ठेवण्यात आले. कारवाई झाल्यानंतरही नेमके कुणाला पकडले, कुणाला आणखी पकडणार आहे, त्याचीही माहिती रात्री १० वाजेपर्यंत कुणालाच देण्यात आली नव्हती. पोलीसच काय, येथील दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्यांना या कारवाईची कल्पना देण्यात आली नाही. दोघांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना कामठीकडे नेल्याची माहिती असून, तेथे त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या कारवाईनंतरही मिलिटरी एजन्सीचे नागपूर व आजूबाजूच्या अनेक ठिकाणी छापेमारी सुरू होती, अशीही सूत्रांची माहिती आहे.

Web Title: Target for Nagpur by ISI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ISIआयएसआय