वाहतूक सुरक्षेचे धडे देण्यासाठी एक लाख विद्यार्थ्यांचे लक्ष्य

By admin | Published: June 21, 2017 02:36 AM2017-06-21T02:36:54+5:302017-06-21T02:36:54+5:30

विद्यार्थी दशेतच वाहतूक नियमांची माहिती दिल्यास त्याची अंमलबजावणी प्रभावी होण्याची शक्यता अधिक असते.

The target of one lakh students to provide traffic safety lessons | वाहतूक सुरक्षेचे धडे देण्यासाठी एक लाख विद्यार्थ्यांचे लक्ष्य

वाहतूक सुरक्षेचे धडे देण्यासाठी एक लाख विद्यार्थ्यांचे लक्ष्य

Next

जनआक्रोशचा संकल्प : निवृत्त शिक्षकांची घेणार मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थी दशेतच वाहतूक नियमांची माहिती दिल्यास त्याची अंमलबजावणी प्रभावी होण्याची शक्यता अधिक असते. हेच विद्यार्थी घरातील मोठ्यांनाही धडे देतील. यामुळे संपूर्ण एक घर वाहतूक नियमांचे धडे गिरवेल. परिणामी, भविष्यात निश्चितच अपघातांची संख्या आपोआप आटोक्यात येईल. आणि म्हणूनच या वर्षी एक लाख विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचे धडे देण्याचा संकल्प जनआक्रोशन घेतला आहे. यात निवृत्त शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी येथे दिली.
जनआक्रोश व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी सुरक्षा, सर्वांची सुरक्षा’ शीर्षकाखाली विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियमांचे धडे गिरविण्याच्या संकल्पाला सुरुवात करण्यात आली. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मंचावर जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, डॉ. वाय.एस. देशपांडे, डॉ. वर्षा ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वाहतूक नियमांच्या माहिती पत्रकाचे उपस्थितांच्या हस्ते लोकार्पणही करण्यात आले.
कासखेडीकर म्हणाले, वाढत्या शहरीकरणामुळे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती होणे काळाची गरज झाली आहे. म्हणूनच ‘जनआक्रोश’च्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून दर शनिवारी एका शाळेला भेट दिली जात आहे. तिथे ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटशन’च्या मदतीने वाहतुकीच्या नियमांच्या माहितीसोबतच अपघात कसे होतात, काय दक्षता घेतल्यास अपघाताला दूर ठेवता येईल आदी सांगितले जात आहे. याचा दुसरा भाग म्हणजे, विद्यार्थ्यांनाच वाहतूक सुरक्षेचे दूत करण्याचे. आम्ही आमच्यापुढे एक लाख विद्यार्थ्यांचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी निवृत्त शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. सध्याच्या घडीला १० शिक्षक मदतीला सामोर आले आहे. ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनीही आपल्या नावाची नोंद जनआक्रोशकडे करावी, असे आवाहनही त्यांनी केले. संचालन डॉ. सुनीती देव यांनी तर आभार डॉ. अनिल लद्धड यांनी मानले.

Web Title: The target of one lakh students to provide traffic safety lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.