नागपुरात ज्येष्ठ नागरिकांना केले जातेय टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:14 AM2018-06-06T10:14:46+5:302018-06-06T10:14:54+5:30
ते येतात, धाकदपट करतात. ‘पोलीस आहोत आम्ही’, असे सांगणाऱ्या या गुन्हेगारांनी उपराजधानीत प्रचंड दहशत निर्माण केली आहे.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ते येतात, धाकदपट करतात. रहदारीच्या मार्गावर अनेकांसमोर ज्येष्ठांचे दागिने त्यांच्याच हाताने त्यांच्या अंगावरून काढून घेतात अन् पळून जातात. त्यांना ना कुणाचा धाक, न दरारा. ‘पोलीस आहोत आम्ही’, असे सांगणाऱ्या या गुन्हेगारांनी उपराजधानीत प्रचंड दहशत निर्माण केली आहे. आयुष्यभर काटकसर करून दागिन्यांच्या रुपात आपली कमाई जपणारे पीडित अशा प्रकारे लुटले गेल्यामुळे कमालीचे व्यथित झाले आहेत. वृद्धत्वामुळे आधीच हतबल झालेल्या या ज्येष्ठांना पोलिसांच्या नावाने लुटमार करणाऱ्या समाजकंटकांनी अक्षरश: हादरवून सोडले आहे.
पोलीस असल्याचे सांगून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना दोन आठवड्यांपूर्वी सीताबर्डी पोलिसांनी पकडले त्यामुळे आता पुन्हा ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटण्याचे गुन्हे होणार नाही, असा गोड समज सर्वसामान्य नागरिकांसोबत काही पोलिसांनीही करून घेतला होता. मात्र, सोमवारी ४ जूनला एकाच दिवशी उपराजधानीत हुडकेश्वर, प्रतापनगर आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटून नेण्याचे तीन गुन्हे घडले. त्यामुळे साऱ्यांनाच पुन्हा एकदा धसका बसला आहे.
पोलिसांसारखे धडधाकट दिसणारे अन् पोलिसांसारखेच वर्तन करणारे हे गुन्हेगार ५० वर्षांपुढील महिला-पुरुषांना हेरतात. ज्येष्ठ नागरिक या गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट आहे. जास्त वर्दळ नसलेल्या ठिकाणी त्यांना अडवतात.
त्यांच्या नजरेत आलेल्या व्यक्तीला ते स्वत:चा परिचय कधी सीबीआय, कधी सीआयडीचे अधिकारी तर कधी पोलीस आहोत म्हणून देतात. ‘समोर काही अंतरावर लुटमार झाली किंवा अन्य कोणता मोठा गुन्हा घडला, अशी थाप मारतात. तुम्हाला लुटमारीची भीती वाटत नाही का, असा प्रश्न करून तुम्ही तुमचे दागिने अंगावरून काढून पिशवीत ठेवा, असा सल्ला देतात. प्रसंगी जवळचा रुमाल किंवा कागद देतात. त्या रुमालात किंवा कागदात दागिने ठेवण्याचा बनाव करून रुमालाची ती पुठळी किंवा पुडी संबंधित व्यक्तीच्या हातात देऊन पळून जातात.
कधी लुटमार झाल्याची किंवा अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे सांगूनही धाक दाखवता आणि त्यांची तपासणी करण्याच्या नावाखाली दागिने घेऊन पळून जातात. घटनेच्या काही वेळेनंतर संबंधित व्यक्तीला आपले दागिने लुटल्याचे आणि ते पोलीस नव्हे तर भामटे होते, हे लक्षात येते. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीचा छडा तीन आठवड्यांपूर्वी सीताबर्डी पोलिसांनी लावला. १६ मे रोजी या टोळीतील हुमायूं जाफरी (वय ४३, रा. आम्बिवली मुंबई) आणि इमरान अली नाजिर अली (वय २५, रा. टिकरीटोला, शहाडोल, मध्य प्रदेश) या दोघांना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाखांचे सोनेही जप्त केले. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आल्यामुळे आता असे गुन्हे नागपुरात घडणार नाहीत, असा सर्वसामान्य नागरिक तसेच शहर पोलिसांनी भाबडा समज करून घेतला होता. मात्र, गुन्हेगारांनी तो खोटा ठरवला. सोमवारी हुडकेश्वर, प्रतापनगर आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोतया पोलिसांनी तीन ज्येष्ठ नागरिकांचे लाखोंचे दागिने लुटून नेले.