कोरोना नियंत्रणासाठी ‘टास्क फोर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:45 AM2020-07-19T00:45:41+5:302020-07-19T00:46:57+5:30

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार करण्याचा निर्णय घेतला.

Task Force for Corona Control | कोरोना नियंत्रणासाठी ‘टास्क फोर्स’

कोरोना नियंत्रणासाठी ‘टास्क फोर्स’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार करण्याचा निर्णय घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत नागपूर कोरोनामुक्त करू या, असे आवाहन केले.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागपुरात रुग्णसंख्या वाढली. बाजारातील गर्दी नियंत्रित करण्यायासंदर्भात चर्चा करण्याकरिता मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात विविध व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत शनिवारी बैठक घेतली. आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, श्रमिक विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल लोया, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अभय देशपांडे, शरद कोलते यांच्यासह नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, एनसीसीएलचे विष्णू पचेरीवाला, रामअवतार तोतला, रेडिमेड मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रितेश मोदी, जागनाथ रोड क्लॉथ मार्केट असोसिएशनचे सचिव कल्पेश मदान, स्टील अ‍ॅण्ड हार्डवेअर चेंबर ऑफ विदर्भचे अध्यक्ष राजेश लखोटिया, सचिव संजय अग्रवाल, एनएचआरएचे अध्यक्ष तेजिंदरसिंह रेणू, नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव हेतल ठक्कर, नागपूर सराफा असोसिएशनचे राजेश रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव संजय शिरपूरकर, व्हीटीएचे उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी, एनसीसीएलचे सहसचिव तरुण निर्बाण आदी उपस्थित होते.
नागपुरात कोविड रुग्णांची संख्या २१०० च्या घरात आहे. मृत्यूसंख्याही २५ वर पोहोचली. यामागील सर्वात मोठे कारण बाजारात नियम पाळले जात नाही. सम-विषम तारखेचा नियम असतानाही त्याचे उल्लंघन होते. दुकानात क्षमतेपेक्षा अधिक ग्राहक, मास्क न वापरणे, फिजिकल डिस्टन्स्ािंग न पाळणे या सर्व बाबींमुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. किमान स्वत:च्या दुकानासाठी व्यापाऱ्यांनी नियम पाळले तरी कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकते, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले. बहुतांश दुकानदार नियमांचे पालन करतात. परंतु जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यास व्यापारी संघटनांचे प्रतिनिधींनी पाठिंबा दिला.

कोविड अ‍ॅम्बेसडर आणि टास्क फोर्स
सर्व व्यापारी कोविड-१९ च्या नियंत्रणासाठी ‘कोविड अ‍ॅम्बेसडर’ म्हणून कार्य करण्यास तयार आहोत, अशी सूचना बी.सी. भरतीया व रितेश मोदी यांनी केली. कर्मचाऱ्यांचा उपयोग करून प्रत्येक व्यापारी असोसिएशन एक टास्क फोर्स तयार करेल. ग्राहकांना फिजिकल डिस्टन्स्ािंग, मास्क लावण्याच्या सूचना देण्याचे काम ही टास्क फोर्स करेल. अश्विन मेहाडिया व राजेश रोकडे यांनी शहरात ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक असोसिएनशनतर्फे लावण्याची सूचना केली. या सर्व सूचनांचे तुकाराम मुंढे यांनी स्वागत केले.

स्वातंत्र्यदिन हा कोरोनामुक्ती दिन ठरावा!
व्यापाऱ्यांनी संघटितपणे मनपा प्रशासनाला साथ दिली तर कोरोना नागपुरात हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. यंदाचा स्वातंत्र्यदिन हा नागपूरसाठी ‘कोरोनामुक्ती दिन’ करण्याचा निर्धार करू या, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. या आवाहनाला व्यापारी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला.

Web Title: Task Force for Corona Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.